HW News Marathi
राजकारण

मोदींना तो ‘राजयोग’ मिळाला !

मुंबई । जगभरात शुक्रवारी (२१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी ५ वर्षांपूर्वी २१ जून हा दिवस म्हणून घोषित केला आणि भारताची ही प्राचीन परंपरा संपूर्ण जगाने स्वीकारली. दरम्यान, या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने आज (२२ जून) पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. “योगात इतकी ताकद आहे की, योग दिवसाच्या पर्वातच मोदी हे जगातील ‘सर्वशक्तिमान नेते’ म्हणून घोषित झाले. ‘योग’ अनेक आहेत, पण ‘राजयोग’ सगळय़ात महत्त्वाचा आणि खरा! हा राजयोग मोदींना मिळाला”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे. तर, “योगाचे धडे कुणी तरी प. बंगालातील ममतादीदींना द्यायला हवेत. त्यांचे रक्त उसळत आहे व ते आरोग्यास हानीकारक आहे. त्यांनीही योग करावा म्हणजे राज्यातले प्रश्न निवळून जातील”, असे म्हणत भाजपविरुद्ध सतत आक्रमक भूमिका घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवसेनेने टोला लगावला आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

योगामुळे गरिबी दूर होईल म्हणून जास्तीत जास्त गरिबांपर्यंत योग पोहोचला पाहिजे, असे मोदी सांगतात. योगांमध्ये आजाराशी सामना करण्याची ताकद नक्कीच आहे. मोदी स्वतः अठरा-अठरा तास काम करतात. योगी आदित्यनाथही तसेच काम करतात. याचे सामर्थ्य ते पहाटे उठून करीत असलेल्या ‘योग’ साधनेत आहे. योगात इतकी ताकद आहे की, योग दिवसाच्या पर्वातच मोदी हे जगातील ‘सर्वशक्तिमान नेते’ म्हणून घोषित झाले. ‘योग’ अनेक आहेत, पण ‘राजयोग’ सगळय़ात महत्त्वाचा आणि खरा! हा राजयोग मोदींना मिळाला.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल. मोदी यांच्या पुढाकाराने जगात ‘योग दिवस’ साजरा होत आहे. स्वतः पंतप्रधानच ‘योग’ करीत असल्यामुळे देशानेही ठिकठिकाणी ‘योग’ केल्याची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यातही गमती घडल्या आहेत. हरयाणात एके ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री खट्टर यांची कार्यक्रमानंतर पाठ फिरताच लोकांनी योगासनांसाठी तेथे अंथरलेल्या चटयाच पळवल्या आणि यशस्वी ‘चौर्ययोगा’चेही प्रात्यक्षिक दाखवून दिले. ‘इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस’च्या पशू प्रशिक्षण केंद्रात तर जवानांसोबत चक्क तेथील कुत्रे, घोडे यांनीही योगासने केली. लडाखमध्ये 18 हजार फूट उंचीवर उणे 20 अंश सेल्सिअससारख्या शरीर गोठवणाऱया थंडीत आणि ‘आयएनएस रणवीर’ या युद्धनौकेवर भर समुद्रात आपल्या जवानांनी योगासने केली. वाराणसी या पंतप्रधानांच्या मतदारसंघात काही लोकांनी गंगा नदीत ‘जलयोग’ करून आजचा योग दिन साजरा केला. शुक्रवारी सकाळी संपूर्ण देशच ‘योगा’ने भारावून गेला होता. मोदी यांचा जनमानसावर इतका प्रभाव पडला आहे की, मोदी जे सांगतात त्याबरहुकूम देश डोलतो. मोदी यांनी ‘योग’ सुरू करताच सारा देश ‘योग’मय झाला. भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी, राज्यपालांनी मैदानात, बगिच्यात ‘योग’ केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस व रामदेवबाबा यांनी ‘योग’ चळवळीचे नेतृत्व केले. ‘योग’ लोकप्रिय व्हावा, घराघरात पोहोचावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘आयुश’ नामक स्वतंत्र मंत्रालय केले आहे. आता 2019च्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला. यावर योगगुरू रामदेवबाबा यांचे म्हणणे आहे की, ‘‘विरोधकांकडे पुढील

पाच वर्षे भरपूर वेळ

आहे. त्यांनी पाच वर्षे कपालभाती नामक योग करत राहावा.’’ योग केल्यामुळे गरिबी दूर होईल असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. तसा कपालभातीचा प्रयोग केल्यामुळे विरोधकांत ऊर्जा निर्माण होईल काय? ‘योग’ अनेक आहेत, पण ‘राजयोग’ सगळय़ात महत्त्वाचा आणि खरा! हा राजयोग मोदींना मिळाला. त्यामुळे ‘योग’ व ‘सत्ता’ याचा संबंध आहे हे मान्य करावे लागेल. ‘राजयोग’ नसेल तर मैदानात, बगिच्यात फक्त चटया अंथरून श्वास आत-बाहेर सोडण्यात काय हशील? त्यामुळेच संसदेच्या सभागृहातही अनेकदा विरोधी बाकांवरील सदस्य ‘डुलकी योग’ किंवा ‘आरामासन’ करताना दिसत असावेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू असताना बराच वेळ ‘मोबाईल योग’ करताना दिसले. तोदेखील बहुधा राजयोग नसण्याचाच परिणाम असावा. काँग्रेस पक्षाने त्यावर असा खुलासा केला आहे की, राष्ट्रपतींच्या भाषणातील काही हिंदी शब्दांचा अर्थ राहुल यांना समजला नाही. त्यामुळे ते मोबाईलमध्ये त्या शब्दांचा अर्थ शोधत होते. आता खरे काय हे राहुल आणि त्यांच्या पक्षालाच माहीत; पण ‘राजयोग’ नसल्यानेच राहुल यांना हे असे ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागत आहेत हे मात्र खरे. मुळात काँग्रेससारख्या पक्षांना सध्या शवासनाची गरज आहे. त्यांचा श्वास जवळजवळ बंदच झाला आहे. पुन्हा अनेक योगासने अशी आहेत की, तंगडे मानेत अडकू शकते किंवा तंगडय़ांत तंगडे अडकू शकते. आमच्या योगास प्राचीन परंपरा आहे व गेल्या काही वर्षांपासून योग, आयुर्वेदास जगात स्थान प्राप्त झाले आहे. योगामुळे प्रकृती ठाकठीक राहते.

शरीर हलके

होते. अगदी ‘कॅन्सर’सारखे आजारही योगामुळे दूर होत असल्याचे दावे आहेत; पण त्या सगळय़ांच्या वर पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे. योगामुळे गरिबी दूर होईल म्हणून जास्तीत जास्त गरिबांपर्यंत योग पोहोचला पाहिजे. सर्व प्रश्नांवर रामबाण म्हणजे ‘योग’च असे जे मोदी सांगतात त्याचे विश्लेषणही पंतप्रधान महोदयांनी उत्तम केले आहे. गरिबांपर्यंत योग पोहोचल्याने ते आजारापासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल. ही आधुनिक योगाची मात्रा ग्रामीण आणि आदिवासी भागात पोहोचलेली नाही. शहरांपासून गावांपर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत योगाची मात्रा न्यायची आहे असे मोदी यांनी सांगितले आहे. योगामध्ये आजाराशी सामना करण्याची ताकद नक्कीच आहे. मोदी स्वतः अठरा-अठरा तास काम करतात. योगी आदित्यनाथही तसेच काम करतात. याचे सामर्थ्य ते पहाटे उठून करीत असलेल्या ‘योग’ साधनेत आहे. योगात इतकी ताकद आहे की, योग दिवसाच्या पर्वातच मोदी हे जगातील ‘सर्वशक्तिमान नेते’ म्हणून घोषित झाले. ब्रिटिश हेरॉल्ड या मान्यवर मासिकाने जो वाचक कौल घेतला त्यात मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना मागे टाकले. योग धर्म, जात, पंथांच्या वर आहे असेही मोदी म्हणतात. त्यांची भावना शुद्ध आहे. तरीही संसदेत ‘जय श्रीराम’ विरुद्ध ‘अल्लाहो अकबर’चे नारे लागतात. संसदेची एका क्षणात धर्मसंसद होते. ‘योगा’चे धडे कुणी तरी प. बंगालातील ममतादीदींना द्यायला हवेत. त्यांचे रक्त उसळत आहे व ते आरोग्यास हानीकारक आहे. त्यांनीही योग करावा म्हणजे राज्यातले प्रश्न निवळून जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही संजय राऊतांना उद्या न्यायालयात हजर रहावे लागणार, कारण…

Aprna

उद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक

News Desk