HW News Marathi
राजकारण

“महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल”, शरद पवारांचा विश्वास

मुंबई।  अशी परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला शिवाय जनतेसाठी चांगले निर्णयही घेतले. कोरोना या राष्ट्रीय संकटात आरोग्य विभागाने परिस्थिती चांगली हाताळली त्यामुळे अडीच वर्षात हा प्रयोग फसला हे म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान आहे असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

ज्यावेळी आमदार राज्याबाहेर गेले ते इथे आल्यानंतर ज्यापध्दतीने त्यांना नेण्यात आले ही वस्तुस्थिती सांगतील व शिवसेनेसोबत भूमिका स्पष्ट करतील व बहुमत कुणाचे आहे हे सिद्ध होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.
बंडखोर आमदारांनी इथे येऊन बोलले पाहिजे आसाममध्ये राहून नाही असे खडेबोलही शरद पवार यांनी सुनावले. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली यामागे भाजप नाही असे आमच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मात्र मला तसे वाटत नाही. आमच्या सहकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती जरूर माहीत आहे. मात्र गुजरात आणि आसाम मधली परिस्थिती मला अधिक माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी आताच वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. माझ्याकडे देशातील सर्व पक्षांची यादी आहे. या यादीत देशात सहा अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी असे सहा पक्ष आहेत. काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, बसपा आणि राष्ट्रवादी या पक्षांनी शिंदे यांना मदत करायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे उरलेला राष्ट्रीय पक्ष कोणता ते सर्वांना माहीत आहे असेही शरद पवार म्हणाले.
सूरत आणि आसाममध्ये बंडखोर आमदारांची व्यवस्था करणारे जे लोक दिसले. ते अजित पवार यांच्या परिचयाचे नाहीत, ते माझ्या परिचयाचे आहेत. उदा. सूरतमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे मराठी गृहस्थ आहेत. ते संसदेचे सदस्य असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. त्यांचा सूरतमधील व्यवस्था करण्यात सहभाग असेल तर याचा अर्थ काय समजायचा? आसाममध्ये संबंध व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने केली. आसाम राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मदत करणारे राज्यात कुणी दिसत नसले तरी तिथे कोण काय करतंय हे सर्वांना दिसत आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निकाल पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले.
ज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत बारा ते सोळा लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पुर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे ही स्थिती जे लोक आसाममध्ये गेले आहेत, त्यांच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला. बाकी त्याला काही अर्थ नाही असेही शरद पवार म्हणाले.
जे आमदार गुवाहटीला गेले आहेत, त्यातील अनेक आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे किंवा होती. त्याचा  परिणाम हा त्यांच्यावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही. तसेच या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्त्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकार विरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्त्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही असेही शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Aprna

मोदीजी, भारत हा तुमच्या वडीलांची किंवा आजोबांची जहागीर नाही !

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk