HW News Marathi
राजकारण

राज्यातील नेत्यांनी विजयाबद्दल केले आहेत ‘हे’ दावे

मुंबई | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. राज्यात कोणाची सत्ता येणार, राज्याच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार आणि कोणाला या राज्यातली जनता नाकारणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, या निवडणुकांकरिता प्रत्येक पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सर्व पक्षांतील दिग्गजांनी घेतलेल्या प्रचारसभा चांगल्याच गाजल्या. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी आपल्या विजयाबद्दल वेगवेगळे दावे केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल

राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, सर्वच प्रमुख वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्सनुसार राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “यंदाच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल”, असा दावा केला आहे.

मला महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य मिळेल

राज्यातील विधानसभेकरिता सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नुकताच आपला ‘स्वाभिमान पक्ष’ भाजपमध्ये विलीन करणारे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी देखील सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर, “ही निवडणूक एकतर्फी होणार असून आपल्याला ८० टक्के मतं मिळणार” असा दावा नारायण राणेंनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. “कणकवली मतदारसंघातून मला महाराष्ट्रातील एक नंबरचे मताधिक्य मिळेल”, असा दावा नितेश यांनी केला आहे.”आम्ही गेल्या ५ पाच वर्षात केलेली कामे आणि आता भाजपची साथ यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे”, असे नितेश राणे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

अब की बार २२० पार नहीं, तो अब की बार २५० टच !

राज्यातील विधानसभेकरिता सोमवारी (२१ ऑक्टोबर) एकाच टप्प्यात मतदान झाले. दरम्यान, यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मतदानानंतर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आम्ही ‘अब की बार २२० पार’ असा नारा दिला होता. मात्र, आता आम्ही म्हणतो कि ‘अब की बार २२० पार नहीं तो अब की बार २५० टच.” त्याचप्रमाणे पुढे कोथरूड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी “कोथरूड येथील निवडणूक एफतर्फी आहे. कोथरूडमधून १ लाख ६० हजार मताधिक्याने मी विजयी होईन. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० जागाही महायुती जिंकेल”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उदयनराजे भोसले किमान २ लाख मतांनी पराभूत होतील !

महाराष्ट्र भाजपच्या प्रचाराकरिता खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यभर प्रचारसभा घेतल्या. याच पार्श्वभूमीवर, १३ ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड विधानसभा मतदारसंघात अमित शाह यांची सभा झाली. याच पार्श्वभूमीवर एच.डब्ल्यू.मराठीने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली. “सातारा लोकसभा पोटनिवडणुकीला उदयनराजे भोसले किमान २ लाख मतांनी पराभूत होतील”, असा दावा कराड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी एच डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला. “मी जरी लढलो असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीदेखील उदयनराजे २ लाख मतांनी पराभूत होतील”, असे चव्हाण म्हणाले.

पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल !

“पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल”, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. पुढे संजय राऊत “अब की बार शिवसेना १०० पार” असा नारा देखील यावेळी दिला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदारांच्या रुपाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना १०० तोफांची सलामी देण्याचा निर्धार शिवसेनेने केल्याचे संजय राऊत यांनी या दसरा मेळाव्यात बोलताना सांगितले.”आपले चांद्रयान २ तांत्रिक बिघाडामुळे चंद्रावर उतरु शकले नाही. पण, शिवसेनेचे हे ‘सूर्ययान’ (आदित्य ठाकरे) २१ ऑक्टोबरनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंबद्दल हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे, “आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

येत्या काळात आम्ही विराेधी पक्षात नाही तर सत्तेत असू !

“मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे कि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येत्या विधानसभेनंतर विराेध पक्ष म्हणून समोर येईल. पण मुख्यमंत्र्यांनी ते विधान वंचितला घाबरून केले आहे. खरंतर येत्या काळात आम्ही विराेधी पक्षात नाही तर सत्तेत असू”, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. एमआयएमने स्वबळाचा नारा दिल्याने वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना असे म्हटले कि, “एमआयएमसाठी आमचे दरवाजे अद्याप खुले आहेत मात्र त्यांनीच त्यांचे दरवाजे लावून घेतले आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे |उद्धव ठाकरे

News Desk

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

Aprna

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Aprna