HW News Marathi
राजकारण

सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले !

मुंबई | ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देऊन, दारुच्या होम डिलिव्हरीला ग्रीन सिग्नल देणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे. मद्यविक्रीला परवानगी दिल्याने भाजपचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला असून विद्यमान सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले. घरोघरी दारू पोहोचवू व लोकांना अशा प्रकारे धुंद करू असे वचन पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकपूर्व भाषणात दिले नव्हते. राज्य सरकारच्या या निर्णयाचा ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे

सामनाचे आजचे संपादकीय

सरकारने निर्णयच घेतला नव्हता तर उत्पादन शुल्क मंत्र्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक आहे असे का म्हटले होते? तिकडे मुख्यमंत्रीही म्हणतात, निर्णय घेतलेला नाही, घेणारही नाही. मग त्याविषयीच्या बातम्या आधी का दिल्या, हा प्रश्न उरतोच. म्हणजे खडा टाकून बघायचा. लागला तर लागला! आता तुम्ही कितीही सारवासारव केली तरी तुमचा खरा चेहरा पुन्हा उघड झालाच आहे. (शराब के) ‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’ हे लक्षात आले असेलच.

आमच्या देशात काय चालले आहे तेच कळत नाही, पण गेल्या साठ वर्षांत देशात काहीच झाले नाही. अगदी सुई-दोऱ्याचीदेखील निर्मिती झाली नाही असे म्हटल्यावर भगतगण टाळ्या वाजवतात. आता त्यांच्यासाठी ‘अच्छे दिना’ची घोषणा शिवरायांच्या महाराष्ट्रात झाली आहे. डिजिटल इंडियात इतर काही मिळाले नसले तरी महाराष्ट्र सरकारने ‘ऑनलाइन दारू विक्री’ची योजना जाहीर करून धमाल उडवून दिली आहे. आता घरपोच दारू समस्त तळीरामांना मिळू शकेल. साठ वर्षांत कोणत्याही सरकारला जे करता आले नाही असे हे भव्यदिव्य काम करून जाहीरनाम्यात नसलेल्या वचनपूर्तीचा झेंडा राज्य सरकारने फडकवला आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाची भयंकर गिधाडे फडफडत आहेत. पाणीकपात आजच सुरू झाली आहे. त्यामुळे घरपोच दारूच्या बाटल्यांबरोबर आता पाण्याची बाटली मोफत मिळणार काय? दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी समस्त महिलावर्गास दिलासा देण्यासाठी रात्रीचे डान्स बार बंद केले. त्या निर्णयाशी ते शेवटपर्यंत ठाम राहिले. विद्यमान सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले. घरोघरी दारू पोहोचवू व लोकांना अशा प्रकारे धुंद करू असे वचन पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकपूर्व भाषणात दिले नव्हते. त्यांनी सगळय़ांना अन्न-वस्त्र- निवारा व ‘नीतिमान भारता’चे वचन दिले, पण महिलांशी अनैतिक वागणारे मंत्रिमंडळात आहेत आणि नशेबाजांना उत्तेजन देणारे निर्णय घेतले जात आहेत. हे सर्व कशासाठी, तर म्हणे ‘ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह’ रोखण्यासाठी. लोकांनी दारू पिऊन गाडी चालवून

अपघातांना निमंत्रण

देऊ नये, घरीच दारू पिऊन जीवनाची नासाडी करावी यासाठी हा नवा फंडा. दुसरे कारण असे सांगण्यात येते की, बनावट दारू रोखण्यासाठी हा निर्णय होत आहे. थोडक्यात, महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ पडला आहे हे तर माहीत आहे, पण अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय, अशी शंका यावी असा सगळा हा प्रकार आहे. घरी दारू पिऊन लोक गाडय़ा चालवणार नाहीत याची गॅरंटी काय? मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तो भ्रष्टाचार, काळा पैसा व बनावट नोटा रोखण्यासाठी, पण उलट बनावट नोटांचा आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढला आहे. बनावट दारू प्रकरणाचे तसेच व्हावे, पण सरकारला तळीरामांची इतकी काळजी आहे की, त्यांनी शुद्ध पहिल्या धारेचीच प्यावी यासाठी सरकारने किती कष्ट घेतले आहेत पहा. देशात सर्वाधिक भूकबळी गेल्याचे आकडे समोर आले. बेरोजगारीही कोटी कोटीने वाढते आहे. त्यावर उतारा म्हणून हा घरपोच दारूविक्रीचा फंडा काढला आहे का? धन्य आहे या सरकारची व त्यातील अकलेच्या कांद्यांची. या व्यवहारातून म्हणे सरकारला महसूल मिळणार आहे. सरकारला किती महसूल मिळणार आहे ते माहीत नाही, पण दारू निर्मात्यांशी झालेल्या मोठय़ा ‘डील’नंतर हा निर्णय घेतला असावा. ही सोय जशी भाजपात घुसवलेल्या ‘वाल्यां’ची आहे तशी दारू उत्पादकांची आहे. या सगळ्या व्यवहारातून निवडणुका लढविण्यासाठी

मोठी आर्थिक उलाढाल

आधीच झाली आहे. भाजपवाले पैशांचा पाऊस कुठून पाडतात याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले आहे. आता म्हणे घरपोच दारू पोहोचविण्याची राज्य सरकारची कोणतीही योजना नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे खरे मानले तरी काही प्रश्न उपस्थित होतातच. सरकारने निर्णयच घेतला नव्हता तर उत्पादन शुल्क मंत्र्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक आहे असे का म्हटले होते? नेहमीप्रमाणे त्यांनी त्यावर घूमजाव केले आहे आणि सरकारने असे कोणतेही धोरण आखलेले नाही असे आता म्हटले आहे. तिकडे मुख्यमंत्रीही म्हणतात, निर्णय घेतलेला नाही, घेणारही नाही. मग त्याविषयीच्या बातम्या आधी का दिल्या, हा प्रश्न उरतोच. म्हणजे खडा टाकून बघायचा. लागला तर लागला! समजा त्यावरून टीकेचे मोहोळ उठलेच तर नकारघंटा बडवायची आणि हात वर करून पुन्हा आपला शूचिर्भुताचा आव आणायचा, असा हा प्रकार म्हणावा लागेल. बरं, घरपोचच पुरवठा करायचा असेल तर दुष्काळग्रस्त जनतेला अन्नधान्य पोहोचवा, जनावरांना चारापाणी पोहोचवा. पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सोसणाऱया भागाला पाणी कसे पुरवता येईल याचा विचार करा. ते राहिले बाजूला आणि दारू घरपोच देण्याचा कसला विचार करता? आता तुम्ही कितीही सारवासारव केली तरी तुमचा खरा चेहरा पुन्हा उघड झालाच आहे. (शराब के) ‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’ हे लक्षात आले असेलच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna

बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही !

News Desk

जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील !

News Desk