पुणे | लोकसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अनपेक्षित पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या प्रचाराबाबत काही सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी विधानसभेच्या प्रचारपद्धती संदर्भात बोलताना चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचाराचे उदाहरण दिले आहे. “संघाच्या कार्यकर्त्यांचे विचार पटले नाहीत तरी त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात”, असे शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
“संघाचे स्वयंसेवक सकाळी एखाद्याच्या घरी गेले आणि घर बंद असेल तर पुन्हा संध्याकाळी जातात. तेव्हासुद्धा जर संबंधित व्यक्ती भेटली नाही तर ते दुसऱ्या दिवशी जातात. पण संबंधित व्यक्तीला भेटतातच. आपल्याला जरी त्यांचे विचार पटत नसतील तरी त्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास काही हरकत नाही. त्या आत्मसात करायलाच हव्यात”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यतील भोसरी येथे आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते.
“लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. आता विधानसभेच्या तयारीला लागा. त्यांसाठी लोकांच्या घराघरात पोहोचा. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेत राष्ट्रवादीचेच आमदार निवडून यायला हवेत”, असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. यावेळी शरद पवार यांनी संघाच्या स्वयंसेवकांचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे, शरद पवार यांनी येत्या विधानसभेत आपण नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचा पुनर्रुच्चार देखील केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.