HW News Marathi
Uncategorized

“पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त” पडळकरांचा घणाघात!

मुंबई। संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, म्हणून आता दुर्घटनाग्रस्त भागातील लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे

गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का करत नाही?

कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3800 कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते. त्याचप्रमाणे फडणवीस सरकारने केलेल्या मदतीप्रमाणे हे सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. फडणवीस सरकारने तातडीने व कोणतेही निकष न लावता घरपडीला 95000, भाड्याने राहण्यासाठी 25000, व्यापाऱ्यांना 50, 000 तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत केली होती. आता तर परिस्थिती महाबिकट आहे. एकीकडे यांच्या ‘लॉकडाऊन -लॉकडाऊन’ च्या खेळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि व्यापारी रडकुंडीला आलाय. असा दुहेरी संकटाचा सामना सामान्य जनता आणि व्यापारी करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत केली पाहिजे

आस्मानी आणि कोरोनाच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत केली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात लवकर अंमलात आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अजित पवारांचा दौरा

अजित पवार यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.

फडणवीस करणार पाहणी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री ज्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात जाऊ शकले नव्हते, त्या गावात देवेंद्र फडणवीस जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील मोरगिरी/आंबेघर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेणार. त्यानंतर सायं. 5.15 : हुंबरळी ता. पाटण येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

शेतीचं सुमारे 66 कोटींचं नुकसान

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं सुमारे 66 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके बाधित झाली आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. ऊस, भात, सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतातील पाणी कमी झाल्यानंतरच पंचनामे केले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात निवडणूक 2017 : तारखा जाहीर, दोन टप्प्यात मतदान

News Desk

राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत – अटलबिहारी वाजपेयी | Rajiv Gandhi | Atal Bihari Vajpayee | Congress | BJP

Gauri Tilekar

अयोध्या प्रकरणातील १८ पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

News Desk