HW News Marathi
Uncategorized

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

जालना। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा सातत्यानं काँग्रेसकडून होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेला शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी छेद दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याची हाक संजय जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनाही काँग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा त्यांच्या दहा मिनिटांच्या भाषणावरून सुरू झाली आहे.

निवडणुका आपल्याला आपल्या ताकदीवर लढायच्या आहे

संजय जाधव यांनी जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हे मोठं विधान केलं आहे. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत. निवडून आल्यावर युती होईल न होईल. युती करायची की नाही हा आपला अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणुका आपल्याला आपल्या ताकदीवर लढायच्या आहेत. त्यासाठी आजपासून गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक ही मोहीम राबवावी लागेल. सर्वांचा डेटा तयार करा. त्या व्यक्तिच्या सुखादुखात सहभागी व्हा. विधानसभेत जिथे यश येईल असं वाटत होतं तिथे मागे यावं लागलं. त्या ठिकाणी काम करा. चार पावलं मागे घेऊन पुढे या. येणारी निवडणूक आपल्याच विजयाची असेल, असंही जाधव यांनी सांगितलं.

पण विधानसभेत युती होईल असं वाटत नाही

यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील युतीवरही भाष्य केलं. युती होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणले तरी होणार नाही. तुम्ही उद्या म्हणले करा तरी होणार नाही. कारण विधानसभेत कुणी ती जागा घ्यायच्या इथून सुरू आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही युती होत नाही. झाली तर लोकसभेला होईल. तीही त्यांची गरज म्हणून होईल. आपली गरज म्हणून नाही. पण विधानसभेत युती होईल असं वाटत नाही, असं ते जाधव. विधानसभेत युती होणार नाही हे माझं अॅनालिसिस आहे. हे व्यक्तिगत मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होत नाही. आपली आणि भाजपची जागेवरून झाली नाही. मग तीन पक्षांची कशी होणार? कोणी कोणी काय घ्यायचं आणि काय द्यायचं?

आम्हाला सक्षम उमेदवार त्या त्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल

विधानसभेची निवडणूक आपण कशी हरलो काय झालं आता हे सगळं वारकाचे उकीरडे उकरीत बसण्यात काही अर्थ नाही. आम्ही हरलोत. आता आम्हाला पुन्हा जिंकायचे असेल तर तहान लागल्यावर विहीर खोदून नाही होणार तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्हाला जिंकाव्या लागतील. उद्याची विधानसभा जिंकण्यासाठी तोच आमचा पाया असेल. म्हणून उद्या जिल्हापरिषदा, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका असतील खरेदी-विक्री संघ, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्याही असेल या सर्व निवडणुका जिंकण्यासाठी आम्हाला सक्षम उमेदवार त्या त्या सर्कलमध्ये उभा करावा लागेल. नाही तर आम्ही एक रेटतोय, दुसरा दुसराच रेटतोय… तिसरा तिसरा रेटतोय, कार्यकर्ता चौथाच म्हणतो या खिचातानीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

मी सर्वांना बोर्ड दिले

आतापासूनच तयारी करा, एकवाक्यता ठेवा. एका एका सर्कलमध्ये कुणाला उभं करायचं कोण उभं राहू शकतं. कोण चांगली ताकदवाला आहे. कोण लोकप्रिय आहे. त्या त्या सर्कलमधील लोकांना माहीत असतं. त्यामुळे आतापासूनच तयारी करा. आज गाव तिथे शिवसेनेची शाखा, युवासेनेची शाखा तयार करा. बोर्डावर कुणाचं नावच टाकायचं नाही. ‘शिवसेना शाखा घनसावंगी आपलं सहर्ष स्वागत करत आहे’ असा बोर्डच गावाच्या वेशीवर ठेवा. म्हणजे त्यात सर्वांचंच नाव आलं. बबलूचं नाव टाकलं की तिकडे उद्धवला राग, उद्धवचं टाकलं की आप्पाला राग.. हा राग लोभच नको. ते शहागडवाले लांबच राहिले पुन्हा… त्यामुळे कुणाचं नावच न लिहिण्याची संकल्पना मांडल्याबद्दल अंबादास दानवेंचं अभिनंदनच केलं पाहिजे. शिवसेनाही आपल्यासाठी सर्व काही आहे. शिवसेनेचं नाव बोर्डावर आलं म्हणजे सर्वांचंच नाव आलं. आम्ही परभणीतही हे अभियान सुरू केलं आहे. मी सर्वांना बोर्ड दिले. घनसावंगीलाही मी बोर्ड देईन, असं त्यांनी सांगितलं.

जाधव नेमकं काय म्हणाले

“आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत. काल जिल्ह्यात कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं जणू काही मोठा अपराधच केला होता. तुम्हाला सगळं जमतं. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची आहे. तरी देखील मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही शिरसावंद्य मानला. जे काही आदेश येईल ते मान्य केलं. पण प्रत्येक गोष्टीत सध्या खाजवाखाजवी सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे”, असं जाधव म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदूत्वाची व्याख्या संघाने बदलली

News Desk

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’विरोधात आज काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन

News Desk

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

Aprna