मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा आज (१७ जून) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच पक्षांचे नेते कोश्यारी यांना शुभेच्छा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांचं आपल्या स्टाईलमध्ये अभिष्टचिंतन केलं आहे. इतकंच नाही तर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती मार्गी लावून महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केलं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त
गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहील.
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्याच म्हणाव्या लागतील. कारण, संजय राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा देताना विधान परिषदेच्या १२ आमदारांची रखडलेली नियुक्ती करुन महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांकडून राजभवनावर जात शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे देण्यात आलीय. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज राजभवनावर जात कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी जी यांची आज राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.@BSKoshyari @maha_governor pic.twitter.com/SJ0Awff26h
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/6ffWBCbd89
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 17, 2021
१२ आमदारांची यादी ७ महिन्यांपासून राज्यपालांकडेच
ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर १५ जूनला सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे १२ आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत १२ आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, २५ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी ६ नोव्हेंबर २०२० ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन ७ महिने उलटले तरीही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.