मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. ते आज (२२ मार्च) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या हस्तक्षेपावर टीका केली.
केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
‘सगळ्यांचे राजीनामे घेतले तर सरकार कसे चालवणार?’
अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाही. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंग यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे.
याप्रकरणात चौकशी करून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय घेतला पाहिजे, या भूमिकेत चूक काय आहे. केंद्रातील अनेक मंत्र्यांवरही आरोप आहेत. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सगळ्यांचेच राजीनामे घेतले तर सरकार कसे चालवणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
सरकार चौकशीला सामोरे जायला तयार असताना विरोधक राजीनाम्याचा आग्रह का धरत आहेत? याप्रकरणात विरोधी पक्षाने धुरळा उडवून संभ्रम पसरवण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा सरकारच्या प्रतिमेची काळजी आम्हाला जास्त आहे. सरकारने बदली केलेल्या एका अधिकाऱ्याच्या आरोपामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊ देणार नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा’
देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर करा, महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. आम्ही यापुढे विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांवर कारवाई मग गृहमंत्र्यांवर का नाही?
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. याप्रकरणात सरकारने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना दूर केले. मग अनिल देशमुख यांचा राजीनाम का घेतला जात नाही, असा सवाल पत्रकारांना विचारला. त्यावर संजय राऊत यांनी राज्य सरकारला आयुक्त बदलण्याचाही अधिकारी नाही का, असा प्रतिप्रश्न केला. राज्य सरकार हवं तेव्हा आयुक्त बदलण्याचा निर्णय घेऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.