HW News Marathi
महाराष्ट्र

…तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवार, १४ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात एका पाठोपाठ एक असे एकूण १४ ट्विट करत शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. कलम 370, इशरत जहाँ, १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट, काश्मीर फाईल्स यासारख्या मुद्यांवरून फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील, दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्ब स्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान महेश तपासे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जातीवादी आहेत असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीवादी घोषित करणे एवढंच भाजपकडून बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली आहे, असेही महेश तपासे म्हणाले. गेल्या ५०-५५ वर्षात देशाचे नेते शरद पवार यांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे. हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही याची माहिती महेश तपासे यांनी दिली.

घटना समितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आरक्षणा संदर्भामध्ये समान संधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी आपले ट्विट केले आहे. तसेच जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरीता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारांनी म्हटले तर त्यात गैर काय? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

मंडल आयोगाची स्थापना जनता पार्टीचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केली होती हे देवेंद्र फडणवीस विसरले का? आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पवारांनीच केली त्यामुळे फडणवीसांना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पण हरकत आहे का असा थेट सवाल महेश तपासे यांनी केला आहे. तसेच १९९३ ला मुंबईमध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पवारांनी तातडीने दूरदर्शनवरून मुंबईत तेरा स्फोट झाले असून तेरावा स्फोट हा मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल वस्तीत झाला अशी घोषणा केली होती. पवारसाहेबांच्या या घोषणेमुळे मुंबईमध्ये धार्मिक हिंदू-मुस्लीम क्लेश टळला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. श्रीकृष्ण आयोगानेदेखील पवारांच्या या चतुराईचे समर्थन केलं आणि मुंबई दोनच दिवसांमध्ये पूर्व परिस्थितीप्रमाणे नॉर्मल झाली याची आठवणही तपासे यांनी फडणवीसांना करुन दिली आहे.

काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया जोरात असताना काश्मिरी पंडितांच्यासोबत मुस्लिम, शीख, बौद्ध व इतर समाज यांच्यावरही फार मोठे अत्याचार झाले आणि त्यांनाही आपली घरे सोडावी लागली परंतु काश्मिर फाईल हे फक्त काश्मीर पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र त्या चित्रपटाचे रंगवण्यात आले आहे त्यामागे भाजपचा काय राजकीय हेतू आहे हे आता भारतातल्या सबंध जनतेला समजलेला आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून काश्मिरी नागरिकांच्या पुनर्स्थापनेसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये काय प्रयत्न केले हेही देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर, सांगलीचा दौरा करणार

News Desk

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

News Desk

आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही !

News Desk