HW News Marathi
मुंबई

वाहनांच्या मार्गक्रमणाच्या खात्रीसह पारदर्शकता जपणेही होणार सुलभ

मुंबई | महानगरपालिकेशी संबधित विविध नागरी सेवा सुविधा विषयक कामांसाठी पालिकेला आपल्या वाहनांसह खाजगी वाहनांचीही आवश्यकता असते. या वाहनांमध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी असणारे पालिकेचे टँकर, घनकचरा वाहून नेणारे कॉम्पॅक्टर्स, इमारतींच्या विकास प्रक्रियेदरम्यान तयार होणार राडारोडा किंवा नालेसफाईतील गाळ वाहून नेणारी वाहने, मलनि:सारण प्रचालने विषयक कामांसाठीची वाहने यासारख्या वाहनांचा समावेश होतो. ही वाहने आपल्या निर्धारित मार्गाने व ठरलेल्या ठिकाणीच जात आहेत, तसेच त्या वाहनांच्या फेऱ्या देखील ठरलेल्या संख्येनुसारच होत आहेत. यासारख्या विविध बाबींचे संनियंत्रण अधिक सुलभतेने करता यावे, यासाठी संबंधित सर्व वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण बसविणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘व्हीटीएमएस’ उपकरण बसविलेल्या सर्व वाहनांचे संगणकीय व ‘जीपीएस’ आधारित सनियंत्रण करण्यासाठी अव्याहतपणे कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष देखील लवकरच सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.

पालिका क्षेत्रात एखाद्या ठिकाणी काही वैशिष्ट्यपूर्ण कारणांमुळे एखाद्या ठिकाणी अधिक पाण्याची आवश्यकता असल्यास किंवा काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने नियमित पाणीपुरवठा बाधीत झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असल्यास ‘टँकर’ द्वारे पाणी पुरवठा केला जातो. या अनुषंगाने पाणी पुरवठा करणारे पालिकेचे २८ टँकर आहेत. हे टँकर निर्धारित ठिकाणाहूनच पाणी भरत असल्याची व निर्धारित ठिकाणीच पाणी पुरवठा करत असल्याची खात्री करता यावी यासाठी पालिकेच्या २८ टँकर मध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण यापूर्वीच बसविण्यात आले आहेत. यामुळे आता ज्या सोसायटीसाठी पाण्याचा टँकर पाठविण्याची परवानगी मिळाली असेल, त्याच सोसायटी परिसरात टँकर गेला असल्याची खात्री करता येणार आहे. याव्यतिरिक्त जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील इतर ३२४ वाहनांमध्ये देखील हे उपकरण लवकरच बसविण्यात येणार आहे.

‘डेब्रिस’ वाहून नेण्या-या टँकरमध्ये ‘व्हीटीएमएस’

पालिका क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास, धोकादायक इमारतींचे पाडकाम यासारख्या कामांमधून मोठ्या प्रमाणात राडारोडा तयार होत असतो. हा राडारोडा निर्धारित केलेल्या ठिकाणीच वाहून नेणे संबंधित कंत्राटदाराला वा विकासकाला आवश्यक असते. यानुसार राडारोडा वाहून नेण्यासाठी पालिका क्षेत्रात सुमारे ४ हजार वाहने उपयोगात आणली जातात, असा अंदाज आहे. या वाहनांद्वारे वाहून नेला जाणारा ‘राडारोडा’ हा निर्धारित ठिकाणीच टाकला जात असल्याची खातरजमा करता यावी, यासाठी आता या कामाकरिता वापरल्या जाणा-या वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित वाहनांच्या मार्गाचे, ज्याठिकाणी वाहन गेले आहे त्या ठिकाणचे आणि वाहनाच्या फे-यांचेही संगणकीय संनियंत्रण करणे सुलभ होणार आहे. तसेच निधारित ठिकाणी ‘राडारोडा’ न टाकणा-यांविरुद्ध कारवाई करणेही यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

घनकचरा / नाल्यांमधील गाळ वाहून नेणा-या वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’

पालिका क्षेत्रातून उद्भवणारा घनकचरा वाहून नेण्यासाठी साधारणपणे २ हजार ६२८; तर नालेसफाई दरम्यान उद्भवणारा गाळ वाहून नेण्यासाठी सुमारे ७७१ वाहने कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त मलनिःसारण प्रचालने खात्याशी संबंधित कामांसाठी वेगवेगळ्या स्वरुपाची साधारणपणे ६० वाहने कार्यरत आहेत. यानुसार सुमारे ३ हजार ४५९ वाहनांचे मार्गक्रमण हे निर्धारित मार्गाद्वारेच व निर्धारित ठिकाणी होत असल्याची खातरजमा करण्यासाठी आणि वाहनांच्या फे-यांचेही सुयोग्य संनियंत्रण करण्यासाठी या वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार अनेक वाहनांमध्ये यापूर्वीच ‘व्हीटीएमएस’ उपकरण बसविण्यात आले आहे.

२४ x ७ कार्यरत असणारा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष

पाणी वाहून नेणारे २८ टँकर्स, जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील इतर ३२४ वाहने, राडारोडा वाहून नेण्यासाठी उपयोगात येणारी सुमारे ४ हजार वाहने, घनकचरा वाहून नेणारी साधारणपणे २ हजार ६२८ वाहने, नालेसफाईचा गाळ वाहून नेणारी सुमारे ७७१ वाहने, मलनिःसारण प्रचालने खात्याच्या कामांशी संबंधित ६० वाहने; यानुसार पालिकेशी संबंधित विविध यंत्रणांसाठी वापरण्यात येणा-या सुमारे ७ हजार ८११ वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अनेक वाहनांसह पालिकेच्या इतरही वाहनांमध्ये ‘व्हीटीएमएस’ उपकरण यापूर्वीच बसविण्यात आले आहे. मात्र, या सर्व वाहनांच्या मार्गांचे व फे-यांचे संनियंत्रण करण्यासाठी यापूर्वी स्वतंत्र असा ‘मध्यवर्ती नियंत्रण कक्ष’ नव्हता. त्यामुळे याबाबींचे संनियंत्रण करण्यास मर्यादा येत असे. ही बाब लक्षात घेऊन, आता पालिकेशी संबंधित विविध कामांसाठी वापरण्यात येणा-या पालिकेच्या वाहनांसह संबंधित कामांसाठी वापरण्यात येणा-या खाजगी वाहनांचे संगणकीय संनियंत्रण करणे सुलभ व्हावे, यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष आता सुरु करण्यात येत आहे.या अंतर्गत ‘व्हीटीएमएस’ उपकरण असलेली वाहने आपल्या निर्धारित जागी व निर्धारित मार्गानुसारच जात असल्याचे संनियंत्रण ‘जीपीएस’च्या आधारे करण्यात येणार आहे. यासाठी ‘ग्रँट रोड’ परिसरात असणा-या महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कार्यालयातील निश्चित करण्यात आलेल्या जागी नियंत्रण कक्ष उभारण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सध्या सुरु आहे.

लवकरच सुरु होणारा हा ‘मध्यवर्ती नियंत्रण कक्ष’ दिवसाचे २४ तास व आठवड्याचे सातही दिवस (२४x७) अव्याहतपणे सुरु राहणार आहे. या नियंत्रण कक्षात प्रक्षेपक वा ‘एलईडी’ आधारित एका मोठ्या ‘व्हिडियो वॉल’ सह ४ संगणक बसविण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असणा-या या नियंत्रण कक्षात संनियंत्रणासाठी प्रत्येक पाळीत किमान ४ कर्मचारी असणार आहेत. यानियंत्रण कक्षामुळे राडारोड्याची, कच-याची किंवा पिण्याच्या पाण्याची वाहतूक ही योग्य प्रकारे व निर्धारित जागीच होत असल्याची खातरजमा करता येणार आहे. ज्यामुळे पारदर्शकता जपण्यासह प्रभावी संनियंत्रण करणे साध्य होणार आहे, अशीही माहिती विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी कुर्ला रोडवर चालत्या बसला लागली आग

News Desk

मराठा आंदोलकांची उद्या मुंबई बंदची हाक

News Desk

पायधुनी पोलिसांकडून पाकिटमारी करणारी टोळी अटकेत

News Desk