नवी मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. येत्या ११ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता गणेश नाईक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
गणेश नाईंकांसोबत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कोकण आयुक्तांची भेट घेत उद्या (१० सप्टेंबर) वेगळा गट स्थापन करण्याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून यात भाजप प्रवेश होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या २२ आणि अपक्ष ४ नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुरू आहे.आमदार संदीप नाईक यांनी ३१ जुलै रोजी भाजप प्रवेश केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ आणि काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा देखील भाजप प्रवेश झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.