मुंबई | दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) नूतनीकरण प्रकल्पात मनसे उडी घेणार, याचा अंदाज येताच शिवसेनेकडून प्रकल्पासाठी निविदा काढण्याची घाई करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं.
शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची विनंती त्यांनी केली, दुसरीकडे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई शिवसेना आणि प्रशासन करताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कच्या मुद्यावरुन आता शिवसेना-मनसे आमने सामने येणार आहेत.
मनसेचे आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र
शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली.
आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. महापालिका आयुक्त निविदा प्रक्रिया थांबवणार का? आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय बदलणार शिवाजी पार्कवर?
राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी ६ कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसेच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीने शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिवाजी पार्कमैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार करणार केली जाणारआहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर CSR च्या माध्यमातून rain water harvesting प्रकल्प राबवण्याचा राज साहेबांचा मानस pic.twitter.com/s7hyKBe7S9
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 25, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.