नवी दिल्ली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. मंगळवार सकाळपासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकीय मंडळींसोबत भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, काँग्रेस नेते कमलनाथ यांची भेट आणि चर्चा झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी या दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
मोदी यांच्याशी दुसऱ्यांदा भेट
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर ममता बॅनर्जी प्रथमच दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दुसऱ्यांदा भेटत आहेत. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भेटीबाबत माहिती दिली आहे.
West Bengal CM @MamataOfficial called on PM @narendramodi. pic.twitter.com/KY8vEYmPwp
— PMO India (@PMOIndia) July 27, 2021
लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली
पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. पंतप्रधान मोदी कलाईकुंडा येथे आले होते परंतू त्यांच्यासोबत व्यक्तीगत भेट झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालला लोकसंख्येनुसार लसींचा कमी साठा मिळत असल्याचे सांगितले यावर पंतप्रधानांनी या विषयावर लक्ष घालू असे उत्तर दिलं असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न
पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून हल्ला चढवताना, मोदी सरकार ‘पाळतशाही’ आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. पेगॅसस हेरगिरी प्रकरण समोर आल्यानंतर ही भेट होत असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न असेल, असंही बोललं जात आहे. या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या भाजपा विरोधी पक्षांच्या बैठकीतही सहभागी होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मोर्चेबांधणी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.