नवी दिल्ली । गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीत अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आणि केंद्राच्या ३ कृषी कायद्यांविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाने आज (२६ जानेवारी) आक्रमक रूप धारण केले. याच पार्श्वभूमीवर, देशभरातून विविध संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“गेल्या ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी अभूतपूर्व आंदोलन करत आहेत. देश उपाशी असताना ज्या शेतकऱ्यांनी देशाला अन्न पुरवले तेच हे शेतकरी आहेत. हे शेतकरी २ महिने थंडी, वाऱ्यात आंदोलन करत आहे. पण पंतप्रधान मोदींनी त्यांची साधी विचारपूस केली नाही. हा प्रजासत्ताक आहे का?”, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“हा प्रजासत्ताक आहे का? हे शेतकरी अशी चर्चा करून करून थकून जातील. केंद्राकडून त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकरी आज वेगळ्या मार्गाने गेले, त्या मार्गाने त्यांनी जायला नको होते. कारण हा महात्मा गांधींचा देश आहे. पण ह्याच शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि गुंड म्हणेपर्यंत भाजप गेले आहे. गेल्या ६१ दिवसात त्या शेतकऱ्यांची मानसिकता काय झाली असेल? ह्याचा विचार करायला हवा. पूर्ण शांततेत आंदोलन सुरू असताना त्यात अडचणी निर्माण केल्या गेल्या. म्हणूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागले. त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे”, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.