HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…!

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

धोका टळला नाही उलट वाढला

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कडक निर्बंधांचे संकेत

जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतू डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सुचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे

याचीही काळजी घ्या !

कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडस ची संख्या वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टींगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी । अमित देशमुख

गावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वेग वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्यासंख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राज्यात ५२ लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा, योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू!

News Desk

देशाचा आकडा ३१ हजारांच्याही पुढे, तर, २४ तासांत ७१ जणांचा मृत्यू

News Desk

कोरोनानंतर गरीबांसमोर मोठे संकट उभे राहणार, राघुराम राजन यांची भिती

News Desk