पुणे । “शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण करावे ही अपेक्षा आहे. मात्र, डोळ्यावर पट्टी बांधून लिखाण केल्यामुळे संजय राऊत यांना भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळवलेले यश दिसले नाही. अर्धवट माहितीवर व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण करण्याचे काम आता संजय राऊत यांनी थांबवावे”, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी संजय राऊत यांनी आज (९?मे) लिहिलेल्या ‘रोखठोक’ सदरातील लेखावर टीका केली आहे.
‘हे’ डोळ्यावर पट्टी बांधलेल्या संजय राऊतांना कसे दिसेल?
“वास्तविक गतवेळच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाने फक्त 3 जागा जिंकल्या होत्या. 2021 च्या आता झालेल्या निवडणुकीत भाजपाने 77 जागेवर विजय संपादन केला. हा विजय 2700 टक्के जास्त आहे. कोणताही पक्ष जिंकण्यासाठीच लढत असतो. त्यामुळे त्यावेळी बहुमतापेक्षा अधिक जागेवर विजय मिळवण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले असते. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तरी भाजपाने मोठे यश प्राप्त केल्याचे समजून येईल. परंतु, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या या संजय राऊतांना ते कसे दिसेल? राजकीय परिपक्वता न ठेवता याकडे बघत असल्याने संजय राऊतांना हा फरक कदाचित लक्षात येत नसावा. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढले. त्यावेळी प्रत्येक जणाने बहुमताने सत्तेत येऊ असा दावा केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्व प्रचार सभांमधून शिवसेना बहुमताने सत्तेत येणार म्हणून सांगितले होते. परंतु, वास्तवात निकाल काय आला होता ? भाजपा 122 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये आपण एकत्र लढलो. जागा वाटपामुळे भाजपाला कमी जागा लढायला मिळाल्या. तरीदेखील भाजपा 105 जागा जिंकून क्रमांक एकच पक्ष ठरला. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला जावा म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते प्रचाराचा भाग म्हणून बहुमताने सत्तेत येऊ म्हणून बोलत असतात. वस्तुस्थिती निकालात स्पष्ट होते आणि मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काय निकाल आला हे महत्वाचे असते. त्यावरूनच विश्लेषण केले जाते. म्हणून संजय राऊत यांनी अज्ञानातून व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण केल्याचे दिसते”, असेही संजय काकडे म्हणाले.
….तेव्हा शरद पवारांनी भाजपाला न मागताच पाठिंबा जाहीर केला होता !
“बाळासाहेब ठाकरे असताना 25 वर्षे भाजपा-शिवसेना युतीत होतो. त्यानंतर युती तुटल्यावर बाळासाहेबांच्या पश्चातदेखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर 5 वर्षे भाजपा-शिवसेना सत्तेत होती. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि भाजपाचे ऋणानुबंध खूप दीर्घकालीन राहिले. पक्ष विस्ताराच्या धोरणातून 2014 च्या निवडणुकीपूर्वी युती तुटली. निवडणुकीनंतर भाजपाला मिळालेल्या 122 जागांमुळे भाजप सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यावर भाजपापासून शिवसेनेला दूर ठेवण्याच्या राजकीय डावपेचातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाला न मागताच पाठिंबा जाहीर केला. हे सर्वश्रूत आहे. असे असतानादेखील भाजपाने आपला जुना मित्र आणि बाळासाहेबांबरोबरील ऋणानुबंधाची आठवण ठेवत शिवसेनेलाच बरोबर घेत सत्ता स्थापन केली. आजही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवश्यक तिथे सर्वोतोपरी मदत करण्यास तत्परता दाखवतात. याकामी आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील सदैव सहकार्याची भूमिका निभावतात.
“महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळाले?”
आमच्याबरोबर 30 वर्षे युतीत राहिलेल्या संजय राऊतांनी कुणाच्या विजयाचा आनंद मानावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, ते जो आनंद व्यक्त करीत आहेत. त्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीची वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घ्यावी आणि मग लिहावे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे बहुमतात सरकार आले. मात्र तिथे काँग्रेस व कम्युनिस्ट शून्य झाले. त्यांची मते ममता बॅनर्जी यांच्या मागे लावली. काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी ही निवडणूक सोडूनच दिली होती. डाव्यांनी देखील ममतांना पाठिंबा दर्शविला. मात्र, वैचारिक मतभेद असलेल्या काँग्रेसचा पराभव करण्यात आणि त्यांना शून्य करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. याचा आम्हाला आनंद आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भाजपबरोबर असताना त्यांचा आलेख कसा होता आणि आता कसा आहे? याचादेखील वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडावा. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळाले? एक मुख्यमंत्रीपद व नगरविकास खातं… परंतु, सत्ता एकवटली आहे ती राष्ट्रवादी-काँग्रेसच्या हातात.
अभ्यास न करता, अज्ञानातून भाजपच्या नेत्यांबाबत लिखाण करू नका !
संजय राऊत यांनी हे लक्षात घ्यावं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांबाबत कधी टोकाचे बोलत नाहीत. अगदी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोनवर बोलले. उत्तम बोलणं झाले. आणि खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले की, पंतप्रधान मदत करीत आहेत. आणि आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत असा लेख लिहितात. संजय राऊत कुणाच्या सांगण्यावरून भाजपाच्या नेत्यांवर टीका करून भाजपाचे वरिष्ठ नेते व उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढवण्याचे काम करीत आहेत? खरं तर, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यांनी विनाकारण संपूर्ण माहिती न घेता, अभ्यास न करता, अज्ञानातून भाजपाच्या नेत्यांबाबत लिखाण करू नये”, असेही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.