HW News Marathi
महाराष्ट्र

रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई। सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत (Ritewadi Water Pump Irrigation Scheme) तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालक रश्मी बागल, महेश चिवटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन कामांना गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.  करमाळा तालुक्यातील विकास प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करा

श्री आदिनाथ कारखान्याचे संस्थापक गोविंदराव पाटील आणि दिगंबर बागल यांच्या स्मृतीस अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, या कारखान्याचे ३२ हजार सभासद असून, त्यांची कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सभासदांच्या हितासाठी कारखान्याचे खासगीकरण होऊ नये, हा कारखाना सहकारी तत्वावरच चालावा, यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित, एक दिलाने काम करावे, सरकार नागरिकांच्या पाठीशी राहील.

महसूल व आरोग्य विभाग नाविन्यपूर्ण व चांगल्या योजना राबवत असल्याचे सांगताना आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाद्वारे  ४.५ कोटी महिलांची आरोग्य तपासणी होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कारखान्यामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी – पालकमंत्री

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने समयसूचकतेने निर्णय घेतला. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे हित कायम राखले गेले आहे. शेतकऱ्यांना  नवसंजीवनी देण्याचा अध्याय या कारखान्याने सुरू केला आहे.  शेतकऱ्यांचा कारखाना वाचविण्यासाठी भैरवनाथ उद्योग समुहाने आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचाच राहणार – आरोग्य मंत्री

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.  सावंत म्हणाले, आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांचा आहे, तो सभासदांचाच राहणार  आहे. सभासदांच्या हितासाठी व कारखान्याच्या प्रगतीसाठी भैरवनाथ उद्योगसमुहाकडून यापुढेही या कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गव्हाण पूजन करून, मोळी टाकून कारखान्याचा २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना !

News Desk

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार! – अजित पवार

News Desk

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

News Desk