HW News Marathi
महाराष्ट्र

पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा! – मुख्यमंत्री

मुंबई  । पावसामुळे वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता पूर  नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (बांधकाम) मनोज  सौनिक, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, प्रधान सचिव पाणीपुरवठा तथा पालक सचिव यवतमाळ संजीव जयस्वाल, प्रधान सचिव (ऊर्जा) दिनेश वाघमारे, प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, चंद्रपूरचे पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव (सहकार) अनुपकुमार यादव, पालक सचिव वर्धा तथा अपर मुख्य सचिव (अल्पसंख्यांक) जयश्री मुखर्जी, गडचिरोलीचे पालकसचिव तथा गृहनिर्माणचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, एनडीआरएफचे कमांडंट आशिष कुमार, एसडीआरएफचे अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त अमरावती, नागपूर तसेच गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा  क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्याचा दररोज आढावा  मी स्वत: घेत आहेच. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तत्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य त्या कायमस्वरूपी  उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूरग्रस्त भागात पूरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ मदत वितरीत झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांच्यावर उपचार देखील वेळेत होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या 109 मृत्यू पैकी साठ टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात  अंगावर वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी प्रतिबंधक यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या.

 

यावेळी गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk

Maratha Reservation | संपुर्ण राज्यभरात आज मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन

swarit

शिवसेने अंतर्गत काम करण्यास पृथ्वीराज चव्हाण-अजित पवारांचा नकार ?

News Desk