HW News Marathi
महाराष्ट्र

“सर्व चाव्या फडणवीसांकडे,तर मग पाठीत खंजीर का खुपसला?”, चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

मुंबई | ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन असं विधान करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. “मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस यांच्याकडेच आहे. फडणवीस हे चतुर व चाणाक्ष नेते आहेत,” असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. उशीरा का होईना पण फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली,हेही नसे थोडके, असं वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘सर्व प्रश्न सोडविण्याची चावी फडणवीस यांच्याकडेच आहे, याचे भान शिवसेनेला २०१९ मध्येच झाले असते तर फडणवीसच पुन्हा युतीचे मुख्यमंत्री झाले असते आणि आज महाराष्ट्राच्या इज्जतीची जी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती टांगली गेली नसती. मात्र त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री करून युतीचे सरकार पुन्हा आणण्याऐवजी आपण पाठीत खंजीर खुपसला, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आपल्या त्या एका कर्तृत्ववान नेत्याला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याचा आनंद आपल्याला मिळाला असेलच, पण काँग्रेस व राष्ट्रवादीला कायम दूर ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वाटेल? याचा क्षणभरही विचार केला असता तर महाआघाडीचा प्रयोग आपण केला नसता,’ असं वाघ यांनी पत्रात नमूद केलं आहे.

‘एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावईशोध आपण लावला आहे. खडसे यांना जर खरेच त्यांचे पंख कापल्या गेल्याचे वाटत होते आणि त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला व राष्ट्रवादीच्या तंबूत ते दाखल झाले. तर तेथे त्यांची पद न देता बोळवण केलेली दिसत आहे. खडसेंच्या सन्मानाची आपल्याला इतकीच चिंता असेल तर सिल्व्हर ओकवर आपले वजन वापरून खडसे यांचे चांगले पुनर्वसन आपण करावे, अशी आपणास विनंती आहे. शिवसेनेत निष्ठावंतांचे हाल झाल्याची उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेतच,’ असा टोला वाघ यांनी लगावला आहे.

‘आमच्या हाती सत्तासूत्रे द्या, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण देतो हा फडणवीस यांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास ओबीसींच्या प्रश्नांबाबत त्यांना असलेल्या सखोल ज्ञानातून आणि ओबीसींप्रति त्यांच्या मनात असलेल्या कळवळ्यातून आलेला आहे. ओबीसी बांधवांमध्ये राहूनच त्यांनी आपल्या राजकारणाचा श्री गणेशा केला आणि ओबीसी समाजाने साथ दिल्यानेच इथवर आलो, अशी कृतज्ञता फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली आहे,’ याची आठवण वाघ यांनी करून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही गोपीचंद पडळकरांचा घणाघात!

News Desk

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

News Desk

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्ववत होणार – विजय वडेट्टीवार

News Desk