HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ ग्वाही….

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेची आशंका दर्शवली जात असताना, डेल्टा प्लस विषाणू थैमान घालू लागला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(१२ जुलै) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (सोमवार)दिले. कोरोना काळात देखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

उद्योजकांसाठी दिलासादायक बातमी

कोरोनाच्या काळात अनेक उद्योग बंद पडले होते. बऱ्याच उद्योजकांना नुकसान सहन करायला लागलं होतं.

यासंदर्भात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माहिती नुसार, आज (१२ जुलै) सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टिने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून, अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीने मालमत्ता जप्त करणे म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Aprna

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, बोर्डाचे आदेश

News Desk

उमरगा MIDC मधील जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची मालमत्ता EDकडून जप्त

Manasi Devkar