अमरावती | ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी सुधारित वितरण क्षेत्रीय पद्धतीत (आरडीएसएस योजनेत) ३३/११ केव्हीचे २२ उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत (HVDS) ६ कोटी ३८ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी उदघाटक म्हणून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आभासी पद्धतीने उपस्थित होते. प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा टाकरखेडा येथे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या कार्यक्रमाला महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचलन) संजय ताकसांडे, प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आभासी पद्धतीने तर मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते,उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, जि प सदस्य जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, टाकरखेडा येथील सरपंच रश्मीताई देशमुख, मुक्कदर पठाण, कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर, भारतभूषण औगड,नितीन नांदूरकर,मनोज निटनवरे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. ऊर्जा मंत्री डॉ.राऊत म्हणाले की, पालकमंत्री ठाकूर यांच्या पाठपुराव्याने उपकेंद्राचे काम गतीने झाले. पालकमंत्र्यांनी मागणी केलेल्या वाठोडा शुक्लेश्वर उपकेंद्राचाही २२ प्रस्तावित केंद्रांमध्ये समावेश आहे.
मागील दोन वर्षात महावितरणकडून विविध वर्गवारीतील ४१ हजार ३३४ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. शेतक-यांच्या हिताचे आणि कृषी ग्राहकांना ६६ टक्क्यापर्यंत थकबाकीत माफी देणा-या कृषी धोरणात ३२ हजार ९९१ ग्राहकांनी सहभाग घेतला असून ५ हजार ४४५ कृषी ग्राहक थकबाकीमुक्त झाले आहेत. शेतकरी बांधवांनी शेतीची २२.२१ कोटी थकबाकी भरल्याने धोरणानुसार १५.६ कोटीचा निधी स्थानिक विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे. १ लाख ३८ हजार ४९५ कृषी ग्राहकांकडे एकूण १ हजार ३११ कोटींची थकबाकी असून निर्लेखन व व्याज विलंब आकार महावितरणकडून माफ केल्यानंतर उरलेल्या ८०१ कोटीपैकी ५० टक्के रक्कम म्हणजे ४०० कोटी भरले तर ४०० कोटी माफ होणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०२२ पूर्वी सहभागी घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
टाकरखेडा शंभू(आष्टी) उपकेंद्रामुळे परिसरातील 22 गावांना फायदा : पालकमंत्री
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात अखंडित व उत्तम दर्जाची वीजसेवा मिळण्यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री यांचेकडून प्रयत्न होत आहेत. टाकरखेडा शंभू (आष्टी) व परिसरातील २२ गावांना या उपकेंद्राचा फायदा होणार आहे. या उपकेंद्रावरून सद्य:स्थितीत १ हजार ७०० कृषी व १२ हजार इतर वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय भविष्यात ग्राहकांची संख्यावाढ लक्षात घेता मागेल त्याला वीज पुरवठा करण्यास मदत मिळणार आहे. वीज वाहिनीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावातच हे उपकेंद्र उभारण्यात आल्याने ३३ केव्ही वलगाव व ३३ केव्ही आसेगाव उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे. पर्यायाने त्याचा फायदा वलगाव व आसेगाव उपकेंद्र परिसरातील ग्राहकांनाही योग्य दाबाची वीज उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.
या उपकेंद्रातून एक कृषी व एक गावठान वाहिनी काढण्यात आली असून या अगोदर असलेल्या कृषी वाहिनीची ५५ किमीची लांबी आता फक्त १८ किमीच झाली आहे.शिवाय या वाहिनीवरील ग्राहकाची संख्याही कमी झाली आहे.तसेच गावठान वाहिनीचीही लांबी ३५ किमीवरून १५ किमीच झाल्याने अखंडित व योग्य दर्जाची वीज देण्यास महावितरणला मदत होणार आहे. अमरावती जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अधिक निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी केली. अनिरुद्ध आलेगावकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी आणि आभारप्रदर्शन अभियंता चौधरी यांनी केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.