HW News Marathi
Covid-19

दारूची दुकाने खुली मात्र जिम बंद, हे दुर्दैवी ! फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

मुंबई | राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. “आज राज्यातील दारुची दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही?”, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यातील जिम सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. तसेच त्यांच्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे”, असेही फडणवीसांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात काय म्हणतात ?

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात कि, “कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही. तर, त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे.”

“आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करु शकत नाही? खरे तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता तर जगात 6 व्या क्रमांकावर आपण आज आहोत”, असे म्हणत फडणवीसांनी राज्यातील कोरोनास्थितीवरून निशाणा देखील साधला.

पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणतात कि, “सर्वच क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज खरेतर ‘अनलॉक’च्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसून येत नाही. केश कर्तनालये ही अन्य राज्यांमध्ये लवकर उघडण्यात आली, महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भात होणार्‍या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. कोरोना प्रतिबंधक उपाय करीत आपल्याला आता हळूहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही”

“एकतर सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारसी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार, याबाबतचा तपशील सरकारला सादर करुन ती क्षेत्र खुली करण्याची विनंती करीत आहेत. असे असताना सुद्धा सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही, ही खरोखरच फारच दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील जिमचालकांनी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सूचविले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घायलाची असेल तर तीही करता येईल. पण, राज्यातील जिम तत्काळ सुरु करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे”, असेही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवलेला नाही, ते न्यायालयाचेच आदेश !

News Desk

सरकाने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे लोकांपर्यंत थेट का पोहोचवण्यात आले नाहीत?

News Desk

फक्त राजकारण आणि महाराष्ट्र द्रोह | जितेंद्र आव्हाड

News Desk