HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण | गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह ४८ जण दोषी

जळगाव | जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी ४५ कोटी रुपयांच्या अपहाराबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर व सुरेश जैन यांच्यासह ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश धुळे न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. काहीच वेळात न्यायालयाकडून या सर्व आरोपींच्या शिक्षेचे स्वरूप स्पष्ट होईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव १३ अधिकाऱ्यांसह तब्बल १२५ पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा न्यायालयात तैनात करण्यात आला होता. जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आल्याने ४९ संशयितांबाबत हा निकाल देण्यात आला आहे.

काय आहे घरकुल घोटाळा प्रकरण ?

जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास इ.स. १९९९मध्ये सुरुवात झाली.

मात्र या योजनेतील सावळागोंधळ सन २००१मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले.. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.

या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे मंत्री सुरेश जैन यांच्यासह खानदेश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा सुमारे ९० जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल २००८ पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास रेंगाळला. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे अटकसत्र सुरू झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

गिरीश बापट यांच्या प्रचारातील सहभागावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’

News Desk