HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगोलीच्या जाधव दांपत्याने केली विठ्ठलाची महापुजा

पंढरपूर | आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठोबा रखुमाईची महापुजा भक्तीमय वातावरणात सोमवारी पहाटेच्या सुमारास संपन्न झाली. यंदा या आषाढी एकादशी निमित्तच्या महापुजेचा मान हिंगोली तालुक्यातील भगवंती कडोळी (ता. शेणगाव) येथील वारकरी अनिल गंगाधर जाधव व वर्षा जाधव या दांपत्याला मिळाला. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुमध्ये हरिनामाचा जागर होत आहे. टाळ-मृदंगाच्या व विठुनामाच्या जयघोषाने भिवरा तीर दुमदुमून गेला आहे. आजच्या महापुजेचा मान मिळालेले जाधव दांपत्य गेल्या चार वर्षांपासून पंढपुरला पायी वारी करत आहे. दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या या दांपत्याला मुलगा आणि दोन मुली असून शेतकरी असलेले जाधव दांपत्य विठ्ठलाची वारी करत आहे.

यंदाचे मानाचे वारकरी दरवर्षी विषेश आणि अधिक भाग्यवान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण दरवर्षी मानाच्या वारकऱ्यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत असला तरी प्रत्यक्ष पूजेचे सर्व विधी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते होत असतं. मात्र यंदा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी येण्यापासून रोखल्यामुळे यंदाच्या पुजेला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मात्र ही पूजा मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यानी रविवारी केली. त्यामुळे यंदा मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पूजेचे सर्व विधी संपन्न झाले.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पालकमंत्री विजय देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक विरेश प्रभू, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, सदस्य संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मानाचे वारकरी कसे शोधले जातात ?

शासकीय पूजा सुरु होण्याआधी दोन तास दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेश व्दार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये जे माळकरी भाविक आहेत. ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. जे सहकुटुंब पायी वारी करतात असे भाविक पुकारले जातात. मंदिराच्या अतिशय जवळ आलेल्या अशा भाविक दांपत्याला महापूजेत सहभागी होण्याचा मान देण्याची प्रथा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद, ८ जणांना वाचवण्यात यश

News Desk

एल्गार परिषदेसंदर्भात पुणे पोलिसांना ६ फेब्रुवारीपर्यंत बाजू मांडण्याची मुदत

swarit

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीत भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय!

News Desk