HW Marathi
HW एक्सक्लुसिव महाराष्ट्र मुंबई राजकारण

“तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता आणि आम्ही…!”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वाढीव वीजबिलाच्या मुद्यावरुन टीका केली होती. ‘वीज कंपन्यांना पत्र लिहून त्याची प्रत पाठवण्याचा सल्ला शरद पवारांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यानुसार पवार संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांशी बोलणार होते, पण पाच-सहा दिवसांत माझ्या कानावर बातमी आली की, अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. त्यांच्यात काय बोलणं झालं हे कळलं नसलं तरी सरकारने त्यानंतर कोणतंही वीजबिलमाफ केलं जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने घुमजाव का केले?, असा प्रश्न मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी विचारायला हवा’, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘प्रसिद्धिसाठी राज ठाकरे असे विधान करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे’. यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एच डबल्यू मराठीशी बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी जयंत पाटील आणि राष्ट्रवादीला सुनावले आहे, “जे नेते लोकसभेच्या वेळेला आपल्या मतदारसंघात राज साहेबांचे भाषण व्हावे म्हणून कृष्णकूंजच्या इथे येत होते. त्यांनी आम्ही प्रसिद्धीसाठी असं बोलत आहोत हे विधान करणंच हास्यास्पद आहे. अख्खी लोकसभा ज्या राष्ट्रवादीने राज साहेबांच्या जीवावर लढवली त्यांनी आमच्याबद्दल हे बोलावं?”, असा उलट प्रश्न त्यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे.

तर, मनसेच्या पुणे येथील महिला शहराध्यक्ष रुपाली ठोंबरे-पाटील यांनीही एच डबल्यू मराठीशी बातचीत केली आहे. “राज ठाकरे यांच्याविषयी जयंत पाटील यानी एक वक्तव्य केलं की, राज साहेबांना प्रसिद्धीची गरज आहे. राज ठाकरेंनी वीजबिल वाढवले आहे, लोकांना वीजबिलाच्या माध्यमातून लुबाडत आहात त्या संदर्भातील प्रश्न केला होता, त्याची माहिती विचारली होती. त्यामूळे जयंत पाटील साहेब आपण असं म्हणालात राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज आहे. राज ठाकरेंना प्रसिद्धीची गरज आहे म्हणून का तुम्ही त्यावेळी खासदारकीला राज ठाकरेंना सभा द्या म्हणत होतात?  पाटील साहेब आज तुम्ही मंत्री आहात, आज तुम्ही मंत्री असताना या वीज बिलाच्या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचे काम होत आहे. आणि त्या लोकांना लुबाडू नये, वीजबिल कमी दरात आले पाहिजे म्हणून राज ठाकरेंनी सरकार म्हणून जाब विचारला आहे”.

“पाटील साहेब कोणाला प्रसिद्धिची गरज आहे हे सर्व लोकांना माहित आहे. तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता आणि मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे नको ते वक्तव्य करण्यापेक्षा आपल्याकडे जी मंत्रीमहोदय म्हणून जी जबाबदारी आहे त्यातून लोकांना वीजबिल कमी करुन लोकांची लूबाडणूक थांबवावी असं तुम्हाला मनसे निवेदन आहे”, अशा शब्दांत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना सुनावले आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

“वीज बिलवाढीसंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. यावर शरद पवारांच्या घरी अदानी आले आणि विजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणं म्हणजे हास्यास्पद आहे. सध्या राज ठाकरे यांनी प्रसिद्धीची नितांत गरज आहे. त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे”, अशी टीका राज ठाकरेंवर केली. तर इंधन दरवाढीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले की, “केंद्राने इंधन दरवाढ कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचे शहाणपण शिकवू नये”, असा टोलादेखील जयंत पाटलांनी भाजप नेत्यांना लगावला.

काय म्हणाले होते राज ठाकरे? 

सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा निशाणा साधत राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. सुरुवातीला ऊर्जामंत्र्यांनी वीज दरात कपात करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी घुमजाव केले. या प्रश्नावर मी राज्यपालांची भेट घेतली तेव्हा त्यांनी मला शरद पवार यांच्याशी बोलून घ्यायला सांगितले. त्यानुसार मी शरद पवार यांच्याशी बोललो. तेव्हा पवार यांनी मला वीज कंपन्यांना पत्र लिहून त्याची प्रत पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पवार संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांशी बोलणार होते, पण पाच-सहा दिवसांत माझ्या कानावर बातमी आली की, अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. त्यांच्यात काय बोलणं झालं हे कळलं नसलं तरी सरकारने त्यानंतर कोणतंही वीजबिलमाफ केलं जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने घुमजाव का केले?, असा प्रश्न मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी विचारायला हवा, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यकर्त्यांना आवाहन- समाजात फुट पडू देऊ नका

News Desk

वनखात्याला अवनी वाघिणीला ठार मारण्याची हौस नव्हती !

Gauri Tilekar

भर उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

News Desk