HW News Marathi
महाराष्ट्र

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई | कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी व  १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात २५ डिसेंबर पासून रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे.

कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत.

विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

कोविड-१९ व विशेषत्वाने ओमायक्रॉन या विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी सात पं.स.मध्ये भाजपची सत्ता  

News Desk

मेहबूब शेख प्रकरणावर अडचणी वाढण्याआधी राजेश टोपेंकडून राष्ट्रवादीची भूमिका!

News Desk

राज्यभरात २२,११८ खोल्यांची सज्जता; ५५,७०७ खाटांची सोय!

swarit