HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या जवळ जाणार का? जयंत पाटील म्हणतात…

मुंबई | राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जाऊ लागले आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीनं आतापर्यंत भेट झालीच नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही भेटीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप जवळ जाणार नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. म्हणून पवार साहेबांनी महाविकास आघाडी स्थापन केली. या चर्चांमध्ये अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. ते म्हणाले की, भाजपला कोरोनाचे काही पडले नाही. काही झालं तरी आम्ही सत्तेत कसं यावं याकडे त्यांचं लक्ष आहे.

केंद्राच्या व्याजदर कपातीचा निर्णय १२ तासांत मागे घेतल्याबाबत ते म्हणाले की, एखादा निर्णय हा विचार करून घेतला जातो ,तो काही असाच होत नाही. फाईलवर निर्णय झाला असणार. पाच राज्याच्या निवडणूक बघून त्या राज्यात फटका बसेल या भीतीने हा निर्णय मागे घेतला. या देशातील अर्थव्यवस्थेची अवस्था अशी केली आहे. निर्णय चुकीचा आहे म्हणून त्या विरोधात बोललो, असं ते म्हणाले.

अमित शाह- शरद पवार भेटीच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, या वृतांत तथ्य नाही. साखर उद्योगातील कॉन्फरन्ससाठी ते अहमदाबादला गेले होते. अशा बातम्या उठवण्याचं काम भाजप सतत करत आहे. आमची आघाडी तोडण्यासाठी भाजप हे करत आहे, असं ते म्हणाले.

शरद पवार-अमित शहा गुप्त भेट?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

दरम्यान, जर शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असेल तर राज्यात असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादीने या भेटीचे वृत्त फेटाळलं

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले अमित शहा?

दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नोटाबदलीच्या रॅकेटमधील 5 पोलिसांवर बडतर्फीची कारवाई

News Desk

गहिनीनाथ गडाच्या पंढरपूर वारीचा मार्ग सरकारने मोकळा करावा, पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, सोमय्यांवरील कारवाईवर फडणवीसांचे वक्तव्य!

News Desk