मुंबई । “गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला व यापुढेही होत राहील”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी भाजपला देखील डिवचले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषणात असे म्हटले आहे की, “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे. भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे”, ही आठवण करुन देताना जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
Tributes to the maker of modern India Pandit Jawaharlal Nehru on his death anniversary. #JawaharlalNehru pic.twitter.com/tvBpmsDXEQ
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 27, 2021
अटलबिहारी वाजपेयींच्या भाषणात पंडित नेहरूंचा गौरवपूर्ण उल्लेख
“१९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते असेही”, असे म्हणत जयंत पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
“पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे”, असे सांगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.