HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं – किरीट सोमय्या 

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत ठाकरे सरकारने जमीन व्यवहार केल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना वॉर्निंग दिली. यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यावर उत्तर देण्याची शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांमध्ये हिंमत नसल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळीही त्यांनी अनेक गंभीर आऱोप केले आहेत.

“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.“पुराव्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणून शिवीगाळ करता. दहिसर घोटाळ्याची सगळी कागदपत्रं असून मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ती दाखलही झाली आहे,” असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

“ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचं नाही,” असं किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे. “मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर मान्यवर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचं तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत आहेत. अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन संजय राऊत तुमची महापालिका ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका,” असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं. ४० पैकी ३० जमीन व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत का आहेत याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. ऱश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावं. आर्थिक व्यवहार करत आहेत याशिवाय मी काही आरोप केलेले नाहीत. मी फक्त खुलासा मागितला आहे. यांची उत्तर देण्याची हिंमत नाही. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल पुरावे देऊनही उद्धव ठाकरेंनी कारवाई केली नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करावी. मी दिलेली कागदपत्रं चुकीची असतील तर जेलमध्ये टाका. पण उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. शिवसेनेत हिंमत असेल तर किरीट सोमय्याला हात लावून दाखवा,” असं जाहीर आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. “उत्तरं देता येत नाहीत म्हणून शिव्या द्यायला निघाले आहेत ही तुमची संस्कृती आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जमीन खाल्ली. म्हाडाने नोटीस दिली आहे. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर किरीट सोमय्यावर कारवाई करावी,” असंही ते म्हणाले आहेत.

मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“पाच हजार बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलच्या नावानेही घोटाळा झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कानात सांगितल्याचं महापौरांचं लेखी म्हणणं आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा प्रोजेक्ट घेऊन पालिका धावत सुटली. तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारच्या कौटुंबिक मित्र बिल्डरकडून घेण्याचा घोटाळा पूर्ण केला. ही तक्रार राज्यपालांकडे दिली होती. राज्यपालांनी त्यांच्याकडील अधिकारांतर्गत लोकायुक्तांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.

“दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारविरोधातील तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार असं महाराष्ट्राच्या जनचेला मी आश्वासन दिलं होतं. हे वचन मी पाळलं आहे. याच्यासंबंधी संजय राऊत किंवा शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यामध्ये हिंमत असेल तर बोलावं. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार. मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचा पक्ष कोणता?

News Desk

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

swarit

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

Aprna