HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपची जनआशिर्वाद नसून ‘जनअपमान यात्रा’ – महेश तपासे

रायगड | कोरोना काळात लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपने काढलेली ही जनआशिर्वाद यात्रा नसून ती ‘जनअपमान यात्रा’ असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

भाजपने शुक्रवारपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू केली असून या यात्रेची पोलखोल करण्याची मोहीम राष्ट्रवादीने उघडली आहे. २१ ऑगस्टपासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेची पोलखोल करत आहेत. आज जनआशिर्वाद यात्रा रायगडमध्ये असून राष्ट्रवादीने अलिबाग येथे पत्रकार परिषद घेतली आहे. मोदींचे सरकार आल्यावर लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. आता जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येते आहे. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांचा अपमान करण्याचे काम हे भाजपवाले करत आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने झाली. त्यानंतर बंगालच्या निवडणूकीवेळी दुसरी लाट आली आणि आता जनआशिर्वाद यात्रा काढून तिसर्‍या लाटेला भाजप आमंत्रण देत आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले आहे. जे काम केलेच नाही ते सांगायचं आणि राजकारणाची भाकरी भाजायची ही पध्दत भाजप वापरत आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

पेट्रोल- डिझेलचे दर वाढतच आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर गॅस सिलेंडरने हजारी गाठली आहे. युपीएचे सरकार असताना एक रुपयांची जरी वाढ झाली तरी ओरड करणारे आज कुठे आहेत असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे. आज(२३ ऑगस्ट) इंधन घेण्यासाठी लोकांकडे पैसा नाहीय. मात्र भाजपसरकार हेच पैसे जमा करून स्वतःच्या योजनांवर खर्च करत आहे. दोन कोटी रोजगार देणार होते. काय झालं दोन कोटी रोजगाराचं असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्रसरकारला यावेळी केला आहे.

ज्या नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म मंत्रालय आहे त्या उद्योगाची आज काय अवस्था आहे अशी विचारणाही महेश तपासे यांनी केली आहे. जनआशिर्वाद यात्रेत पेट्रोल – डिझेलची दरवाढ यावर भाजपवाले काही बोलताना दिसत नाहीत. पेगॅसससारख्या माध्यमातून हेरगिरी करण्याचं कटकारस्थान झालं. गृहमंत्र्यांनी यावर संसदेत भाष्य केले नाही. विरोधी पक्षांनी याविरोधात सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. याविरोधात पेगॅससप्रकरणी एडिटर गिल्डने याचिका दाखल केली. मात्र मोदी सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही असेही महेश तपासे म्हणाले आहेत.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर भारताचा ध्वज ठेवल्यानंतर भाजपाचा ध्वज ठेवण्यात आला हा देशाचा अपमान आहे. एवढी मोठी घटना घडते याचा अर्थ यांना राज्यघटना मान्य नाही. याप्रकरणी भाजपने व पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे. लस इतर देशांना दिल्यावर केंद्राला कोर्टाने फटकारले. मात्र महाराष्ट्राचं कौतुक लसीकरणात झाले. केंद्रसरकारची

लसीकरणाची भूमिका संशयास्पद होती. राज्यसरकारने एक पॉलिसी आणा अशी मागणी केली. आतापर्यंत ५ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र तरीही भाजपचे लोक महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करत आहेत.

जीएसटीचा परतावा मिळावा हा आमचा अधिकार आहे. तो हक्काने मागतो. आम्ही भीक मागत नाही असे ठणकावून सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजनामुळे राज्याला एक रुपयाचीही कमतरता भासू दिली नाही असेही महेश तपासे म्हणाले आहेत. भाजपचे राजकारणासाठी राजकारण सुरू आहे. खोटं पेरण्याचे काम करत आहे. मला सरकार द्या चार महिन्यात इम्पिरिकल डेटा देतो असं फडणवीस बोलत होते परंतु तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवालही महेश तपासे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने केंद्रसरकारकडे इम्पिरिकल डेटा द्या अशी मागणी केली. राज्याला अधिकार दिले अशी ओरड आता करत आहेत. परंतु हे अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याअगोदरच राज्यांना दिले आहेत हे पहिले लक्षात घ्या. मात्र २०१८ मध्ये हेच अधिकार का काढून घेतले असा सवाल करतानाच ५० टक्के आरक्षणाची अट रद्द करण्यासाठी भाजपचे लोक काय करणार आहे अशी विचारणाही महेश तपासे यांनी केली. जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपच्या लोक ६५ टक्के आरक्षण देण्याबाबत काय भूमिका घेणार आहे असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेतून लोकांची दिशाभूल केली जात आहे हेच आम्ही या पत्रकार परिषदेतून जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले .यावेळी माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही !

News Desk

अयोध्येचे निमंत्रण आले असते तरी मुख्यमंत्री गेले असते का? कारण सध्या त्यांची फजिती झाली आहे – गिरीष महाजन

News Desk

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

Aprna