मुंबई। शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहेत,कामांची उद्घाटने होत आहेत तेथे करोना नाही का? मंदिरं बंद आता आमच्या गणपती सणावरही बंदी आणली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी गणपती दर्शन ऑनलाईन केले मग प्रवेश सोहळेही ऑनलाईन करावेत. सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. मोठी मंडळे ऑनलाईन दर्शन सेवा देऊ शकतात, पण छोटी मंडळे कुठून ऑनलाईन यंत्रणेसाठी पैसे आणणार?” असे प्रश्न विचारत मनसे नेते व ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांनी आज(गुरूवार) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.तसेच, “बुलेट ट्रेनसाठी शिवसेना कधीच रस्त्यावर उतरली नाही. मनसेने बुलेट ट्रेनला विरोध करत आंदोलने केली. राज ठाकरे यांची परवानगी घेत नाही, तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही.” असा इशारा देखील यावेळी अविनाश जाधव यांनी दिला.
देवाचं दर्शन हे ऑनलाईन घ्यावं, एवढे आम्ही भाविक कमजोर झालो आहोत का?
ज्या दिवशी आम्ही दहीहंडी लावणार होतो, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी येऊन ताबडतोब सांगितलं की, मी आरोग्य केंद्र बंद करून मंदिरं उघडी करू का? माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा आम्हाला असा प्रश्न विचारतात. त्यावेळी तुमचे प्रवेश सोहळे तेवढ्याच मोठ्याप्रमाणात होतात ना? मग तुम्ही ऑनलाईन का नाही प्रवेश घेत? देवाचं दर्शन हे ऑनलाईन घ्यावं, एवढे आम्ही भाविक कमजोर झालो आहोत का? इतर राज्यांमध्ये सगळी मंदिरं उघडली आहेत. तिथे देव दर्शन सुरू आहे, तिथे कोविड नाही? परंतु आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजुला कोविड येऊन सांगतो की, मंदिर जर उघडली तर तत्काळ येणार. तिसरी लाट येणार आणि खूप मोठा हाहाकार माजणार. असं काहीतरी मुख्यमंत्र्यांचं आहे असं आम्हाला वाटतं.”
त्यावेळी कोविड नसतो?
तसेच, “त्या दिवशी बोलल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं ना? काल डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उड्डाणपुलांची उद्घाटनं केली ना? तिथे प्रचंड मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. मंदिरांच्या बाहेर जी गर्दी होईल, त्यामध्ये कोविड आहे आणि यांच्या उद्घाटन कार्यक्रमांना यांना जेव्हा प्रसिद्धी घ्यायची असते, त्यावेळी कोविड नसतो? याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला व्याख्या सांगावी.” असं अविनाश जाधव म्हणाले.
गणपतीत तरी सरकारने निर्बंध ठेवू नये
याचबरोबर, “लालबागच्या राजा सारखी मोठी मंडळं ऑनलाईन दर्शनाची सोय करू शकतात. छोटी मंडळं काय करतील? अनेक छोट्या मंडळांना देणगीदारच नाही, अशी मंडळं काय करणार आहेत? त्यांचा तुम्ही विचार का नाही करत? सरकारने एकदा त्यांना देणगी जाहीर करावी. कारण, मुंबईमधली ही सगळी मराठी मंडळं आहेत, मराठी मुलंच ही मंडळं चालवतात या मंडळांना आता देणगीदारच नाही. तरी देखील स्वतःच्या खिशातून पैसा काढून ही मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहेत. माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आता गणपतीत तरी सरकारने निर्बंध ठेवू नये.” अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.