HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी सरकारच्या काळात वंचित-बहुजन समाजावर सर्वाधिक अन्याय | ओवेसी

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील जंबिदा मैदान येथे आज २ आॅक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शेतकरी महाअधिवेशन सुरु झाले आहे. दुपारी १२ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या महाअधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी एकत्र एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. मोदी सरकारच्या काळात वंचित आणि बहुजन समाजावर सर्वाधिक अन्याय झाला आहे, असा आरोप करत ओवेसी यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे. हे अधिवेशन म्हणजे अनुसूचित जाती-मुस्लिम समाजाचा एल्गार आहे.

पंतप्रधान मोदींची देशभक्ती देशोधडीला लावणारी

भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर सणसणीत आरोप केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः पैसे खात नाहीत हे खरं पण ते दुसऱ्याला खायला देतात आणि त्यानंतर त्यात वाटा मागतात” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मोदी यांची देशभक्ती देशोधडीला लावणारी आहे. रिलायन्सची दिवाळखोरी संपवण्यासाठी पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. शेतकरी तुमचा नोकर आणि तुम्ही मालक असे नाही हे लक्षात घयावे, असे आंबेडकरांनी सरकारला सुनावले आहे.

…ते संविधानाचे रक्षण काय करणार

“ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले नाहीत तर ते संविधानाचे रक्षण काय करणार,” असा प्रश्न यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओेवेसी यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी संविधान बचाव रॅली काढून केवळ देखावा करीत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. मोदी सरकारच्या काळात वंचित आणि बहुजन समाजावर झालेला अन्याय कायमचा संपविण्यासाठी आपण सर्वांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहाण्याची गरज आहे,” असे आवाहनदेखील यावेळी ओवेसी यांनी केले आहे.

सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या आरक्षण अधिवेशनास प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून हे आरक्षण अधिवेशन संपन्न होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनी या अधिवेशनाला मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोेजकांनी केले आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या दोन्ही समाजातील लोकांच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा होत आहे.

एकीकडे आंबेडकर-ओवेसी यांची नवी राजकीय मैत्री तर दुसरीकडे महाआघाडीकरिता समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर सुरु असणारे प्रयत्न हे भाजपला पराभूत करण्यासाठीच्या अत्यंत जलद राजकीय हालचाली आहेत. या महाअधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून या राजकीय मैत्रीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत.

Related posts

‘महाप्रित`ने इथिओपियाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे! –  धनंजय मुंडे

News Desk

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk

अखेर युट्यूबर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मंजूर

Aprna