मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र, अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी देशभरात गेल्या काही महिन्यांपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या अनलॉकच्या प्रक्रियेंतर्गत अनेक क्षेत्र खुली करण्यात आली आहेत. मात्र, अद्याप धार्मिक स्थळे, मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. सरकारसह सर्वोच्च न्यायालयानेही अद्याप धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यानंतर, आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून आज (२४ ऑगस्ट) यावर भाष्य करण्यात आले आहे. “माय लॉर्ड, येथेही आर्थिक उलाढाल आहेच ! मंदिरे उघडा हो” या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख आहे.
“देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी आर्थिक बाबींचा विचार करावाच लागेल आणि त्यात काय चुकले ? आम्ही स्वत मंदिरे, व्यायामशाळा खुल्या कराव्यात या मताचे आहोत. मंदिराचेही एक अर्थकारण असतेच आणि त्यावरही असंख्य लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थळेच आहेत आणि मंदिरातील देव हे दुर्बलांना आधार देत असतात. प्रत्येकाच्या मानण्यावर ते आहे. कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे सोडवीत असतात. तेव्हा मंदिराचा विषयही आर्थिक उलाढालीचाच आहे, माय लॉर्ड चूकभूल द्यावी घ्यावी”, असे सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.
संजय राऊत यापूर्वी काय म्हणाले होते ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वी राज्यातील मंदिरे उडण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी संजय राऊत यांनी निराळी प्रतिक्रिया दिली होती. “मंदिर उघडल्यावर संक्रमण वाढल्यावर पुन्हा दोष तुम्ही सरकारलाच देणार. त्यामुळे मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्यांनी थोडा संयम बाळगा”, असे आवाहन त्यावेळी संजय राऊत यांनी केले होते. मंदिरे बंद असल्याने मंदिरांच्या जवळपासच्या व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण ठप्प झाल्याने पुजारी आणि व्यापारी वर्गामध्ये मोठी नाराजी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.