मुंबई | ‘शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. उठसूठ पवारसाहेबांवर बोलणार्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो, अशा शब्दात भाजपच्या दु:खावर महेश तपासे यांनी हल्लाबोल केला आहे.
साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत याची आठवणही महेश तपासे यांनी यावेळी पडळकरांना करुन दिली आहे. पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे आणि म्हणूनच वारंवार पवारसाहेबांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे, अशी मिश्किल टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.
काय म्हंटलं होतं पडळकरांनी ?
शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर कुणाची सत्ता येईल याचा विचार करू नये, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. तसेच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार या सरकारमधील नेते असतील किंवा मग शरद पवार असतील वारंवार ते महाराष्ट्रातील जनतेला सांगत आले की पुढील 25 वर्षे ते सत्तेत राहणार असून भाजप सत्तेत येणार नाही. पण मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले. तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. मात्र, पावसात भिजून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ च्या वर जाता आलं नाही, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती. तसेच राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून तुम्हाला पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री सुद्धा बनवता आला नाही, असंही त्यांनी म्हंटलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.