HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेत भूमिका मांडण्याची गरज! – राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 3 कायदेशीर पर्याय दिले आहेत. तसंच मराठा समाजासाठी राज्य सरकारने 5 महत्वाच्या गोष्टी कराव्यात अशी मागणी करत त्या 5 गोष्टी संभाजीराजे यांनी सांगितल्या आहेत.

यावरच भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संभाजीराजे यांना एक सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे यांनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र, राज्य सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

मराठा समाजाने एकत्र व्यासपीठाच्या यावं

महाविकास आघाडी अपयशी ठरल्यानं केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची जात आहे. सरकारमधील मंत्री जी विधानं करत आहेत. त्यावरुन सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही. सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावं. एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं, असं मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केलंय.

संभाजीराजे यांनी नवा पक्ष काढावा किंवा नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे

या सरकारचा लौकिक फक्त घोषणाबाज सरकार म्हणून आहे. कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. मंत्र्यांनी अनेकदा मदतीची घोषणा केली मात्र अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करुन 5 लाखांची मदत दिली.

म्युकरमायकोसिस रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प आहे. यात इजेक्शनचा खर्चही भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरु आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या 5 गोष्टी सांगितल्या?

1. मराठा तरुणांच्या नियुक्त्या : 9 सप्टेंबर 2020 पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या.

2. सारथी संस्था : शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केली, मात्र त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला चालना मिळाली तर समाज बदलेल. सारथीचं अध्यक्षपद मला अजिबात नको. सारथीला 1 हजार कोटी द्या. कोव्हिड काळात पैसा नाही म्हणता, पण आम्ही प्लॅन करु. आता 50 कोटी दिले तर त्यामध्ये आम्ही काय प्लॅन करु? पैसे द्यायचे नसतील तर ती सारथी संस्था बंद करा. शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था नको.

3. अण्णासाहेब महामंडळ : या महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा 25 लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?

4. वसतीगृह : प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.

5. ओबीसींच्या सवलती द्या : 70 टक्के गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात, त्या गरीब मराठ्यांनाही द्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतणारेही तुमच्याच पक्षाचे होते, गडकरींच्या पत्रावरून भास्कर जाधवांची टीका!

News Desk

शैक्ष‍णिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे! 

News Desk