HW News Marathi
महाराष्ट्र

अशा वातावरणात ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही, वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक उत्सव आणि आनंदाचं वातावरण असतं. दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी येत असतात.

परंतु गेल्या वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशास्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ओळखून राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरेंनी या पत्रातून वाढदिवसाला घरी न येता जिथे आहात तिथून पूर्ण काळजी घेऊन कामात राहा, समाजोपयोगी काम करा. त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्वीकारेन असं त्यांनी सांगितले आहे.

वाचा राज ठाकरेंचं पत्र?

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो.तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच.

अजूनही कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाऊन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२,२०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आत्ताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला.

तुम्ही सर्वांनी ह्या कोरोना काळात जागरुकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात राहा, अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवाने आपल्याला सोडून गेलं. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या, त्यांच्यासाठी आता करता आहात तसंच काम करत राहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा.

थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन.

लवकरच भेटू.

आपला नम्र,

राज ठाकरे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लवकरच जाहीर सभा घेणार, सभेत मास्ककाढून सर्वचा सोक्षमोक्ष लावणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

चिंताजनक ! मुंबई – पुण्यात आज सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

भिलारे गुरुंजींचे निधन

News Desk