HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने ! ‘रोखठोक’मधून बोचरी टीका

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे महाविकासआघाडी सरकार आणि गृहखात्याची मोठी मानहानी झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. सचिन वाझे, परमबीरसिंग प्रकारणांमुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. याच पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून आज (२८ मार्च) भाष्य करण्यात आले आहे. “गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. वाझे हा साधा फौजदार. त्याचे इतके महत्त्व का वाढले? हाच तपासाचा विषय. गृहमंत्र्यांनी वाझेंना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग करतात. त्या आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा एकदा दिसले” , असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये आपले मत मांडले आहे.

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद दिले !

परामबीरसिंग यांच्याकडून झालेले गंभीर आरोप आणि पर्यायाने गृहखात्याची झालेली मानहानी या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. याबाबत रोखठोकमध्ये अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद कसे देण्यात आले ? यावर भाष्य करण्यात आले आहे. “अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो”, असा घरचा आहेर रोखठोकमधून देण्यात आला आहे.

तर “अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?”, असाही बोचरा सवालही सामनातून अनिल देशमुख यांना उद्देशून करण्यात आला आहे.

राज्यपाल ठाकरे सरकार जायची वाट बघतात !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमधील वाद आता काही नवा राहिलेला नाही. त्यांची भूमिका सातत्याने ठाकरे सरकारविरोधात आणि भाजपशी जवळीक साधणारी राहिलेली आहे. याबाबतही सामनामध्ये भाष्य करण्यात आले आहे. “राज्यपाल कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. अँटिलिया व परमबीर सिंग लेटर प्रकरणात तरी हे सरकार जाईलच या आशेवर ते होते. त्यावरही पाणी पडले. पुन्हा महाराष्ट्रातील भाजप नेते ऊठसूट राज्यपालांना भेटतात. सरकार बरखास्तीची मागणी करतात. त्यामुळे राजभवनाची प्रतिष्ठाही काळवंडली. सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवून सहा महिने झाले, पण राज्यपाल कोश्यारी हे ठाकरे सरकार जायची वाट पाहत आहेत. हा घटनात्मक भंग आहे”, असे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील हे भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

News Desk

जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात, केबल चालक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेचा नाव न घेता योगींना टोला 

News Desk