HW News Marathi
महाराष्ट्र

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”, सेनेचा मोदी सरकारला सवाल

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. बेडसाठी रुग्ण आणि नातेवाईकांचे अतोनात हाल होत असून, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही ऑक्सिजन व इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. ऑक्सिजनअभावी महाराष्ट्र आणि दिल्लीत झालेल्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडेच काढले असून, ब्रिटनमधील द गार्डियन वृत्तपत्राने करोनाने भारताचा नरक केल्याचं म्हटलं आहे. या वृत्तावरून शिवसेनेनं मोदी सरकारला आजच्या अग्रलेखातून धारेवर धरलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

कोरोना संसर्गाने हिंदुस्थानातील यंत्रणा इतकी कोलमडली आहे की, कोरोनाने हिंदुस्थानचा पार नरक केला आहे, अशी जहाल टीका ‘ब्रिटन’चे प्रतिष्ठीत वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ने केली आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱयांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो.

नाशिकपाठोपाठ मुंबई नजीकच्या विरार येथील एका कोविड इस्पितळास आग लागून 13 रुग्णांचा गुदमरून, जळून मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे दोन दिवसांपूर्वी 29 जण प्राणास मुकले. त्याआधी भंडारा जिल्हय़ातील शासकीय रुग्णालयास आग लागली व 10 बालकांचा मृत्यू झाला. भांडुपच्या ‘ड्रीम’ मॉलमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीतही 11 जणांना जीव गमवावे लागले. महाराष्ट्रात दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. या मालिकांचा शेवट काय ते कोणीच सांगू शकत नाही, पण कोरोनामुळे महाराष्ट्र व देश एका दुष्टचक्रात सापडला आहे हे नक्की.

नाशिकच्या दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन झाल्याचे वृत्त ताजे असतानाच विरारच्या इस्पितळातील आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. एकंदरीत अशा दुर्घटनांनी सर्वत्र आक्रोश व भयाचेच वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या रुग्णांना बेड व प्राणवायू मिळत नाही, याची बोंब सुरू असताना जागोजागी कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागांना आगी लागून रुग्णांचे होरपळून मरण पावणे म्हणजे त्यांना जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलण्यासारखेच आहे. देशातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचे जगानेच मान्य केल्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय म्हणतेय याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

न्यायालयांना अलीकडे उशिराने सोयीनुसार जाग येते. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे व या आपत्तीशी लढण्यासाठी केंद्र सरकारने काय योजना आखली आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने आता मागितली आहे. देशातील गंभीर कोरोनास्थितीची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. आनंद आहे, पण प. बंगालातील राजकीय पुढाऱयांचे, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचेे लाखोंचे रोड शो

आणि हरिद्वारमधील धार्मिक मेळे यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने योग्यवेळी घेतली असती तर लोकांना असे रस्त्यावर तडफडून मरण्याची वेळ आली नसती. दिल्लीतील एका गंगाराम इस्पितळात प्राणवायूचा दाब कमी झाल्यामुळे चोवीस तासांत 25 कोरोना रुग्ण मरण पावले. ही देशाच्या राजधानीची स्थिती आहे. या स्थितीस देशाचे केंद्रीय सरकार जबाबदार नसेल तर कोण जबाबदार आहे? हिंदुस्थान हा कोरोनाचा नरक बनला आहे असे आता परदेशी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागले आहे.

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची विदेशात काय प्रतिष्ठा राहिली? कोरोना संसर्गाने हिंदुस्थानातील यंत्रणा इतकी कोलमडली आहे की, कोरोनाने हिंदुस्थानचा पार नरक केला आहे अशी जहाल टीका ‘ब्रिटन’चे प्रतिष्ठाrत वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ने केली आहे. रोज लाखांवर कोरोना रुग्ण सापडत असताना पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्र सरकारने या संकटाकडे दुर्लक्ष केले. सत्ताधाऱयांचा हाच फाजील आत्मविश्वास कोरोना वाढीस कारणीभूत ठरला असे ‘फटकारे’ ‘गार्डियन’ने मारले आहेत. देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.

देशातील आरोग्य यंत्रणेने कोविड 19 च्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारनेे आरोग्य सुविधांच्या बाबतीत आ त्मनिर्भर होण्यासाठी काय केले? हा प्रश्नच आहे. प. बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडूसारख्या राज्यांतील निवडणुकांकडे झोपून लक्ष देण्याऐवजी कोरोनाच्या दुसऱया लाटेकडे लक्ष दिले असते, तर हिंदुस्थानवर कोरोनाच्या नरकात पडण्याची वेळ आली नसती. गुजरात व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवून ठेवण्यात आली. शवागारात मृतदेह लपवून ठेवले तरी नंतर स्मशानात सामुदायिक चिता पेटल्याच.

अच्छे दिन आणू असे वचन देणाऱयांच्या राज्यात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, लस आणि औषधे नाहीत. फक्त तडफड आणि मनस्ताप आहे. नाशिक, वसई, विरार, भांडुप, भंडाऱयातील इस्पितळांत आगी लागून प्राणहानी झाली हे वास्तव आहे, पण अशी इस्पितळे घाईघाईत उभी करून त्यात रुग्णांना दाखल करावे लागले हाच खरा नरक आहे. देशाचा कारभार रामभरोसे चालला आहे, असे ताशेरे दिल्लीच्या उच्च न्यायालयाने मारले. सर्वोच्च न्यायालयानेही जाता जाता केंद्राला धारेवर धरले. केंद्राकडे राष्ट्रीय योजना काही असेल तर ती सादर करण्याचे फर्मान सर्वोच्च न्यायालयाने काढले. त्याने काय होणार? मोदी व त्यांच्या सहकाऱयांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता.

त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’, सेनेचा भाजपवर हल्ला बोल

News Desk

BMC च्या सर्व शाळेत भगवत गीतेचे पठण करण्याची भाजपच्या नगसेविकेची महापौरांकडे पत्रद्वारे मागणी

Aprna

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

Aprna