HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

मुंबई | राज्यात कालपासून (१८ जानेवारी) ग्रामपंचायत निवडणुकीच निकाल आणि त्याचीच रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांचे बालेकिल्ले ढासळले तर अनेक नव्या उमेदवारांनी यश खेचून आणलं. यावेळी कोकणात पुन्हा एकदा भाजप-सेनेमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. राणेंनी भाजपनेच कोकण मारल्याचा दावा केलाय तर भास्कर जाधवांनी शिवसेनेला कोकणात अभूतपूर्व यश मिळवल्याचं नमूद केलं आहे. अशा सगळ्या राजकीय सुंदोपसुंदीत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून कोकणात काही ठिकाणी सेनेची मोठी पडझड झाली, अशी कबुली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

कोकणात सिंधुदुर्गात राणेंना सत्ता राखण्यात यश आलंय. तसंच अनेक ठिकाणी सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपने कमळ फुलवलं. या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. निकाल हाती आल्यानंतर लगोलग कोकणात राणेंना धक्का देणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सेनेला आव्हान दिलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे . राज्याने विकासाची गती पकडली आहे . विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे . ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे . राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे ? ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो , तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही . ईडी , सीबीआय , आयकरातील ‘ कार्यकर्त्यां ’ ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही . महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे . चला , हवा येऊ द्या !

महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे. ग्रामपंचायतींचे निकाल हा राज्याच्या जनतेचा कौल आहे. ग्रामपंचायती म्हणजे गाव खेड्यातल्या, पाड्यावरच्या विधानसभाच आहेत. त्या निवडणुकीत राज्याची जनता मतदान करते.

आजपर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात 20 वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत. रोहित पवार यांनी चौंडी गावची ग्रामपंचायत जिंकून आणली आहे.

शिंदे हे अहिल्याबाई होळकरांचे वंशज व चौंडी हे अहिल्याबाईंचे जन्मस्थान. त्यामुळे जनतेने भाजप पुढाऱ्यांची सत्ता कशी उलथवून टाकली ते समजून येते. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सर्वच पक्षांतील वजनदार लोकांना, प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के बसले आहेत, पण जगातील नंबर एकचा तोरा मिरविणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली आहे. विदर्भ-मराठवाड्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे. कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे.

विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन हे मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याची तोंडपाटीलकी चंद्रकांत पाटील यांनी केली होती, पण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आहे. भाजपचा पराभव करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबाच दिला आहे. विरोधी पक्षाने गेल्या काही दिवसांत आपल्या अकलेचीच दिवाळखोरी जाहीर केली. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची चिंता न करता त्यांनी सुशांत राजपूत, कंगना राणावत, ईडीची वाटमारी याच विषयांवर कोळसा उगाळण्याचे कार्यक्रम केले. देशात महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी आहे. कृषी कायद्याचा विषय पेटला आहे, पण देशाच्या सुरक्षेची गुपिते फोडणाऱ्या अर्णब गोस्वामीला खांद्यावर उचलून नाचविण्यात विरोधी पक्षाने धन्यता मानली.

या विषयाशी शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा काय संबंध? देशद्रोही कृत्ये करणारा अर्णब गोस्वामी यांचा लाडका आणि हक्कासाठी लढणारा शेतकरी मात्र देशद्रोही ठरवण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला. हा प्रकार त्यांच्यावर उलटला आहे. ठाकरे सरकार लोकांच्या मनास भिडले आहे. उद्धव ठाकरे यांचे विनम्र वागणे लोकांना भावले आहे. ग्रामपंचायत निकालांचा तोच अर्थ आहे. विरोधी पक्षाला आजही एक भ्रम कायम आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पडेल, आपणच पुन्हा अलगद सत्तेवर येऊ. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरायला ही मंडळी तयार नाहीत. आज ना उद्या हे सरकार पडणारच आहे, मग उगाच लोकांच्या प्रश्नावर रान का उठवायचे या भूमिकेत ही मंडळी आणखी किती काळ राहणार? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही व आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे.

महाराष्ट्राच्या जनतेची पावले योग्य दिशेनेच पडत आहेत. भुलभुलैयांच्या धुक्यातून ती बाहेर पडली आहे. पंतप्रधान मोदी हे देशभर पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत, पण महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांचेच गारुड आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गावातील ग्रामपंचायत जिंकू शकले नाहीत. रावसाहेब दानवेंनी भोकरदन गमावले आहे. नागपूर ग्रामीणला अनिल देशमुखांनी बाजी मारली आहे. फक्त आम्हीच, दुसरा कोणी नाही असा तोरा मिरविणाऱ्यांचा हा पराभव आहे. ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे.

विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? महाविकास आघाडी सरकारला जनतेचा ‘कौल’ नाही असे म्हणणाऱ्यांच्याच घरावरची ‘कौले’ जनतेने काढून टाकली आहेत. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुगल मॅपवर कोरोनाची प्रतिबंधात्मक क्षेत्रं दिसणार

News Desk

सचिन वाझेंवर होणार शस्त्रक्रिया!

News Desk

लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही !

News Desk