HW News Marathi
महाराष्ट्र

हत्तीची चाल, वजिराचा रुबाब म्हणजेच ‘लोकप्रिय नेता’ शरद पवार – सामना

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज (१२ डिसेंबर) ८० वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोनाच्या नियमांचं पालन करत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही आज पवारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हत्तीची चाल, वजिराचा रुबाब असं म्हणत पवारांसारख्या शक्तिमान राजकारण्याला उदंड आयुष्य लाभो असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

’८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!’ अशा शब्दात शिवसेनेकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.इतकंच नाही तर यावेळी त्यांच्या आतापर्यंतच्या कामालाही अग्रलेखातून उजाळा दिला आहे. दरम्यान, राज्यावर कोरोनाचं संकट नसतं तर पवारांचा वाढदिवस सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!

देशाचे सगळ्यात अनुभवी नेते, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार शरद पवार हे आज रोजी ८० वर्षांचे झाले आहेत. कोविडचे संकट नसते तर श्री. पवार यांच्या ८० व्या वर्षपूर्तीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा झाला असता, त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेल्या पवारांनी चाहत्यांच्या या उत्साहावर बंधने घातली आहेत. ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८० असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात.

८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे श्री. पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत. पवार स्वतःच ‘सह्याद्री’ बनून देशाचे नेते झाले आहेत. 50 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकांत अजिंक्य आहेत. पवारांना जनतेने भरभरून आशीर्वाद दिले. अर्थात हे आशीर्वाद ज्यांच्या बाबतीत सफल झाले अशा मोजक्या भाग्यशाली माणसांत शरद पवार आहेत.

महाराष्ट्रातील काँगेस पक्षात खूप मोठे नेते मागच्या ७० वर्षांत निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे. १९६२ च्या सुमारास युवक नेते म्हणून त्यांचा उदय झाला. पुलोदचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काँग्रेस सोडलेले व पुन्हा राजीव गांधींच्या उपस्थितीत संभाजीनगरात सामील झालेले पवार आपण पाहिले. शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.

पवारांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता सोनिया गांधी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतून वैचारिक मुद्द्यावर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यागून श्री. पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाडय़ात पूर्ण तयारीनेच उतरले. राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला.

दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली. संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून केंद्रातली पवारांची कारकीर्द दमदारच होती. पवारांवर कायम संशय घेण्यात ज्यांनी धन्यता मानली ते पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे राजकारणातून नामशेष झाले. त्यांना आपले जिल्हेही सांभाळता आले नाहीत. जगातील सर्व आधुनिकता पचवून घेतलेला शक्तिशाली असा उद्याचा औद्योगिक महाराष्ट्र असावा असे स्वप्न पवारांनी पाहिले. त्याच ध्येयाने ते काम करीत राहिले. पवार उद्योगपतींना मदत करतात असा आरोप केला जातो. उद्योगपती नसतील तर राज्याची प्रगती कशी होणार? याचे उत्तर कोणीच देत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येतात व उद्योगपतींना भेटतात, ‘उत्तर प्रदेशात चला’ असे आमंत्रण देतात ते कशासाठी?

श्री. पवार यांनी उद्योगपतींना मोठे केले तसे शेतकरी आणि सहकार क्षेत्रासही बळ दिले. खासगीकरणाचा जोरदार पुरस्कार पवार करीत राहिले. खासगी क्षेत्रातून त्यांनी ‘लवासा’सारखी सौंदर्यस्थळे निर्माण केली, पर्यटन उद्योगास बळ दिले. त्यातून रोजगार व महसूल निर्माण केला. तेव्हा व्यक्तिद्वेषाने पछाडलेल्या राजकारण्यांनी हे प्रकल्पच मोडीत काढून महाराष्ट्राचे नुकसान केले. ‘लवासा’सारखे प्रकल्प इतर राज्यांत निर्माण झाले असते तर महाराष्ट्रातील पुढाऱयांनी त्यांचे कौतुक केले असते, पण देशातल्या राजकारण्यांनी अनेक वर्षे फक्त पवार विरोध हेच राजकारण केले. महाराष्ट्रात पवार विरोधकांना वेळोवेळी महत्त्वाची पदे वाटली गेली. पवार विरोधावर काँग्रेस पक्षातील तीन पिढ्या जगल्या हे कसले लक्षण मानायचे? हीसुद्धा पवारांची ताकदच म्हणायला हवी.

देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत. पवार ८० वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत. साताऱ्याच्या भरपावसातील सभेत विजेचा कडकडाट व्हावा तसे शरद पवार अवतरले. त्यांनी लहानसेच भाषण केले. त्या पावसाळी छायाचित्राने महाराष्ट्रात विजेचा संचार झाला. त्या सभेने त्यांच्या नेतृत्वाचा कसदार कंगोरा पुन्हा समोर आला.

कोरोनाचे संकट, त्यातून लादलेले माणसांतील अंतर हे सर्व असूनही माणसे पवारांकडे खेचली जातात याचे संशोधन त्यांच्या विरोधकांनी करायचे. त्यांचे राजकीय शत्रू आपल्या कर्मानेच संपले. आता उरले ते अगणित चाहते. ८० वर्षांचे होऊनही पवारांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. आज ‘कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेला लोकप्रिय नेता’ असे वर्णन मी पवारांचे करतो. खऱया अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडीडी पूनर्विकासाला स्थानिकांचा विरोध

News Desk

बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून एकलहरे औष्णिक केंद्राचा कायापालट करा! – नितीन राऊत

News Desk

चंद्रकांत पाटलांना ऑडिओ क्लिप्स पाठवल्या?, राज ठाकरे म्हणतात….

News Desk