मुंबई | राज्यात मंदिरे पुन्हा सुरू करण्यावरून राजकारण सुरू असलेले पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
“मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
“मंदिराचेही अर्थकारण आहे. अनेकांचे उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहेत. पुजारी आहेत, मंदिराबाहेर हार- फुले, प्रसादाची दुकाने असतात. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहोचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील, तर भाजपने सरकारशी चर्चा करावी. मंदिर हे उदरनिर्वाहाचेच साधन आहे, भूतलावरची प्रत्येक क्षेत्र उदरनिर्वाहाचे साधन आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.
“काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. मात्र अंतर्गत वादामुळे तो जर्जर झाला आहे, याची मला वेदना आहे. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.