HW News Marathi
महाराष्ट्र

बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे! – सामना 

मुंबई | भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनेला विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे, असं शिवसेनेनं जाहीर करून टाकावं, असं आव्हानच भाजपनं दिलं होतं. त्यालाच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत, त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा, असे मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे!

भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे काैतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे.

त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये.

जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढय़ापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे. शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’.

‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे. दिल्लीच्या सीमेवर जे शीख शेतकरी बांधव आंदोलनात जमले आहेत त्यातील बहुसंख्य हे पूर्वाश्रमीचे ‘जवान’ आहेत व देशासाठी त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवले आहे. यापैकी अनेकांची मुले आजही सीमेवर पाकडय़ांशी लढत आहेत व त्यातील चारजण गेल्या दोनेक दिवसांत शहीद झाल्याचे वृत्त आहे. अशा राष्ट्रभक्तांना जे ‘ट्रोलभैरव’ अतिरेकी किंवा पाकडे म्हणून हिणवतात त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार!

बरं, शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुर्म्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गोयल यांचीही काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत; पण आम्हाला त्याबाबत बखेडा निर्माण करायचा नाही. कारण या देशातील 22 कोटी मुसलमान हे देशाचे नागरिक आहेत. बांगलादेशी घुसखोर, पाकडे, रोहिंगे मुसलमान यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कठोर आहे; पण आतापर्यंत मोदी सरकारने किती बांगलादेशींचे उत्खनन करून त्यांना बाहेर फेकले ते ‘ट्रोलभैरव भक्त मंडळी’ सांगू शकतील काय? मशिदीवरील भोंगा हा वादग्रस्त विषय आहे.

मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही व याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून हा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण थांबवायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडला तरी हा विषय ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाशीच निगडित आहे. आज सर्वाधिक भोंगे हे उत्तर प्रदेश, बिहारातील मशिदींवर आहेत. कश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटवले तरी या भोंग्यांवरून लोकांना उकसविले जाते. तेसुद्धा रोखायला नको काय? आता एखाद्या अजान स्पर्धा प्रकरणावरून हिंदुत्वाच्या शुद्धतेचे मोजमाप करायचेच म्हटले तर लोकांच्या मनातील पुढील प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत.

१) श्रीमान लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर फुले उधळून व जीना हे इतिहासपुरुष असल्याचे सांगून आलेच होते. पण तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता.

२) स्वतः पंतप्रधान मोदी हेसुद्धा खास विमानाने पाकिस्तानात उतरून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचाच केक कापून आले. त्या केकची शिते त्यावेळी अनेकांच्या दाढीत अडकलीच होती. तेव्हा मात्र भाजपचे हिंदुत्व पातळ झाले नाही, तर तो एक ‘मास्टर स्ट्रोक’ होता.

३) भाजपने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. त्यामुळे गोमांस खाणे आणि बाळगणे हा गुन्हा ठरला. त्यातून हिंदुत्व प्रखर झाल्याचा प्रचार झाला; पण आजही गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री अधिकृतपणे सुरूच आहे. ही विक्री बंद केली तर त्या राज्यातील भाजपच्या मतांवर परिणाम होईल म्हणून सगळं ‘बिनबोभाट’ सुरू आहे. मग काय हो ‘ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन की काय ते नाही काय?’  शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱयांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पार्थ लंबी रेस का घोडा,मित्रा थांबू नकोस’ नितेश राणे धावले पार्थ पवारांच्या मदतीला…

News Desk

करुणा शर्माच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर तातडीने धनंजय मुंडेंचा नवा खुलासा

News Desk

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, राष्ट्रवादीकडून अण्णा हजारेंना सवाल

News Desk