HW News Marathi
महाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची गरज लागते…काॅंग्रेसच्या ज्येष्ठांवर सेनेचा घणाघात !

मुंबई | काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली होती. त्यानंतर हा पत्राचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत देखील गाजला. यावरून आता शिवसेनेने सामनातून काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, असं म्हणत शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या ज्येष्ठांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. पत्र लिहणारे नेते सत्तरी ओलांडलेले आहेत. देशपातळीवर सोडा पण राज्य किंवा जिल्हापातळीवरही लोकनेता म्हणून त्यांची ओळख नाही. सोनिया गांधी यांच्याकडे सक्रियतेचा आग्रह धरणाऱ्या या नेत्यांना पक्षाला सक्रिय करण्यासाठी कोणी रोखले होते? यापैकी अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत, याची आठवण शिवसेनेने करून दिली आहे.

तसेच पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाला सक्रिय अध्यक्ष हवा, अशी मागणी केल्याची मोठी गंमत वाटते. मुळात पक्षाला सक्रिय करण्यासाठी या नेत्यांना कोणी रोखले आहे? ७० वर्षाच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतूतू, आटपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी, असे या मंडळींना वाटते काय, असा सवालही शिवसेनेने काँग्रेसमधील ज्येष्ठांना विचारला आहे.

पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती व तामीळनाडूत स्वतःचा पक्षही काढला होता, पण लोकांचे समर्थनच नसल्याने त्यांना हा पक्ष गुंडाळावा लागला. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेससाठी खस्ता खाल्ल्या तशा आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली, पण या घडीस राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखले आहे?

राहुल यांचे नेतृत्व मारायचे व कुजवायचे या राष्ट्रीय षड्यंत्रात घरभेदी सामील होतात तेव्हा पक्षाचे पानिपत नक्कीच होत असते. राहुल गांधी यांनी त्याच संतापातून लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. राहुल व प्रियंकाचे म्हणणे तेच होते…आता हा पक्ष तुम्हीच चालवा, वाटल्यास गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमा. राहुल यांनी हे अत्यंत खुलेपणाने सांगितले व त्यात कोणतीही कटुता नव्हती. मग या आव्हानाचा सामना ‘पत्र पुढाऱ्यां’नी का केला नाही? काँग्रेसची जबाबदारी पुन्हा जर्जर प्रकृतीच्या सोनिया गांधींवर टाकून हे सर्व जुनेजाणते मोकळे झाले. एकही ‘माई का लाल’ पुढे येऊन काँग्रेसचे आपत्कालीन नेतृत्व करण्यास तयार झाला नाही.

राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरसच म्हणावा लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच ‘पत्र पुढाऱ्यां’नी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे महाराजांबद्दल अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला?

News Desk

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा म्हणजे ‘नो-कॉस्ट’ नव्हे, तर ‘नो-मेट्रो’  

News Desk

“असाच बदल बिहारच्या निवडणुकीतही दिसेल”, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

News Desk