HW News Marathi
Covid-19

“शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”, राऊतांचा मोदींना सवाल

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भयंकर दृश्य सध्या देशात निर्माण झालं आहे. दररोज साडेतीन लाखांच्या आसपास रुग्णांची भर पडत आहेत. तर हजारो रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं रोजच्या आकडेवारीतून समोर येत आहे. देशातील परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा बाण डागला आहे.

राऊत यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल यांचं उदाहरणही दिलं आहे. “ प्रेतांना वाली नसल्यामुळे गंगेच्या प्रवाहात प्रेते वाहून येत आहेत आणि करोनावर लस बनवणारे डॉ. अदर पुनावाला राजकारण्यांच्या भीतीने देश सोडून तूर्तास निघून गेले. त्यामुळे शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?,” असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.

काय लिहिले आहे रोखठोक सदरात?

‘कोरोना संकटात देशाची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. हिंदुस्थान एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘याचक’ देश बनला आहे. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, पण ‘ऑक्सिजन’अभावी अयोध्येत हाहाकार माजला आहे. ‘यज्ञ करा, कोरोना नष्ट होईल,’ असे भाजपच्या एक मंत्री यावर सांगतात हे आश्चर्य आहे.

पंतप्रधान मोदी हे पाचेक वर्षे लोकप्रियतेच्या लाटेवर होते, पण गेले दोनेक महिने त्यांच्यावर निरनिराळय़ा बाजूंनी टीका होऊ लागली आहे. राज्यकर्त्यास आपल्याबद्दल नेहमीच चांगले ऐकण्याची सवय बरी नाही. तेव्हा टीका होत आहे ते चांगले लक्षण मानायला हवे. टीका करणारे बहुतेकजण विरोधी पक्षातले आहेत. तसे परदेशी मीडियाचेही लोक आहेत. भाजपात मोदी किंवा शहा यांचे टीकाकार फारसा आवाज करीत नाहीत, पण त्यांना टीकाकार नाहीत असे नाही.

महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, सरदार पटेल, मोहम्मद अली जिना, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरही सतत टीका होत राहिली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावून वृत्तपत्रांवर बंधने आणली. तरीही मिळालेल्या साधनांचा वापर करून लोक त्यांच्यावर टीका करीत होते. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यावर काय कमी टीका झाली? टीका ही लोकशाहीची महत्त्वाची मात्रा आहे व जोपर्यंत टीका स्वीकारली जाते तोपर्यंत कोणत्याही देशात लोकशाही जिवंत आहे असे समजायला हवे.

टीका का करावी?

लोक केंद्र सरकारवर टीका का करीत आहेत? कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले. गंगेच्या प्रवाहात सोडलेले शंभरावर मृतदेह पाटण्याच्या गंगाकिनारी मिळाले. अयोध्येत पंतप्रधानांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन झाले, पण संपूर्ण अयोध्यानगरीत कोरोनाचा हाहाकार माजला असून अयोध्या ऑक्सिजनअभावी गुदमरत, तडफडत आहे. लोकांना इस्पितळे नाहीत.

औषधे नाहीत. लस नाही. प्राणवायू नाही. फक्त श्रीरामाचा नारा आहे. त्याने फार तर राजकीय पक्षांना ऑक्सिजन मिळत राहील. त्या ऑक्सिजनवर यापुढे मनुष्य जगणार नाही. अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार आहे. त्यावर टीका करायची नाही तर काय करायचे?

आंतरराष्ट्रीय याचक

कोरोनामुळे देशात अभूतपूर्व चिंतेचे वातावरण निर्माण झालेच आहे. ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने पावले पडत असताना आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय ‘याचक’ बनलो आहोत. ऑक्सिजनचे टँकर्स परदेशातून येत आहेत. अमेरिकेसारखी राष्ट्रे आपल्याला मदत म्हणून देणग्या देत आहेत. त्या परदेशी मदतीचे वाटपही नीट होत नाही. जनता गावागावांत बेहाल अवस्थेत रस्त्यांवर प्राण सोडत असताना केंद्र सरकारने काय गंमत करावी? प. बंगालात भारतीय जनता पक्षाचे 77 आमदार निवडून आले. त्या सगळय़ांना केंद्रीय सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे राजकारणास अंत नाही. ममता बॅनर्जी किती निर्घृण आहेत, त्या भाजपच्या नवनियुक्त आमदारांना ठारच करतील. म्हणून केंद्राने सुरक्षा दिली, असे एक वातावरण निर्माण केले.

पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व 77 आमदारांना आता ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल. या आमदारांच्या सुरक्षेसाठी 24 तास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडो तैनात असतील. खरे तर राज्यातील आमदारांचे रक्षण करणे कोणत्याही राज्याच्या सरकारचेच काम असते. प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांना निदान संधी तर द्यायलाच हवी होती, पण त्याआधीच भाजपने आपल्या आमदारांना केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर हल्ले होतील या भीतीपेक्षा हे आमदार भाजपपासून फुटून पुन्हा ममता बॅनर्जींच्या तंबूत शिरतील या भयातून त्यांच्यावर केंद्रीय गृहखात्याने स्वतःचे चौकी-पहारे बसवले हेच सत्य आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या फौजांपेक्षा प. बंगालला आज सर्वाधिक गरज ऑक्सिजन आणि वेगवान लसीकरणाची आहे!

जर्मन चॅन्सेलर

आज देशभरातील स्थिती काय आहे? गोव्यात 26 आणि आंध्रात 11 जण फक्त ऑक्सिजनअभावी तडफडत मेले. उत्तर प्रदेशात कोरोना मृतांची प्रेते गंगानदीत फेकली जातात. ती वाहत बिहारला पोहोचतात. गंगेत वाहत आलेल्या 71 प्रेतांची बातमी ताजी असतानाच बलिया आणि गाजीपूर जिल्हय़ांत नद्यांतून 100 प्रेते वाहत आली. मृतांच्या नशिबी परंपरेनुसार अंत्यसंस्काराचेही भाग्य उरले नाही. हा दुसऱया लाटेचा प्रकोप, पण तिसरी लाट येऊ नये म्हणून मध्य प्रदेशातील भाजप मंत्री उषा ठाकूर यांनी यज्ञ करावा व यज्ञात प्रत्येकाने दोन-दोन आहुती द्याव्यात असे सुचवले आहे. कोणी अंगास शेण फासून आंघोळ करीत आहे. कोणी गोमूत्र प्राशन करून कोरोनाशी लढत आहे. थाळय़ा व टाळय़ा वाजवून कोरोनाशी लढा, असे सांगणाऱया पंतप्रधानांच्या देशात दुसरे काय होणार?

यज्ञ, शेणाची आंघोळ, गोमूत्र प्राशन, थाळय़ा पिटणे हेच हिंदुत्व आणि विज्ञान असे वाटणाऱयांना जर्मनीची एक बातमी सांगतो व विषय संपवतो. एका सार्वजनिक कार्यक्रमात जर्मन चॅन्सेलर अंजेला मर्केल यांनी वैद्यकीय शास्त्रज्ञांसमोर चालण्यास नकार दिला. त्या प्रसंगाचा एक फोटो आता जगभरात प्रसिद्ध झाला आहे. त्यात चॅन्सेलर अँजेला मार्केल या डॉ. ऊगुर साहिन व त्यांच्या पत्नी ओझलेम तुरेसी यांच्या पाठीमागे चालत आहेत. या जर्मन शास्त्रज्ञ दांपत्याने जर्मनीमध्ये ‘कोविड-19’ची लस तयार केली आहे. त्या शास्त्रज्ञांचा सन्मान म्हणून आदराने त्या शास्त्रज्ञांच्या पाठीमागे चालत राहिल्या. राजकारणी सत्ताधीश नाही तर डॉक्टर्स, शास्त्रज्ञ सध्याच्या काळात देश वाचवत आहेत. हा शिष्टाचार जर्मन चॅन्सेलरने दाखवून दिला.

जर्मन चॅन्सेलर अँजेला मार्केल यांना पत्रकारांनी विचारले, आपण राजशिष्टाचार का मोडताय? यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले, ‘‘Scholar’s should lead the nations’’ आपल्या राजकारण्यांच्या डोक्यात हे कधीच जाणार नाही. म्हणून चिता पेटत आहेत. कोरोनाग्रस्त प्रेतांना वाली नसल्यामुळे गंगेच्या प्रवाहात प्रेते वाहून येत आहेत आणि कोरोनावर लस बनवणारे डॉ. अदर पुनावाला राजकारण्यांच्या भीतीने देश सोडून तूर्तास निघून गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूरकर विरोधकांची पतंग कधीच आकाशात उडू देणार नाहीत !

News Desk

#NisargaCyclone : आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज, तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफ टीम दखल

News Desk

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वीजबिल सवलतीबाबत कोणताही निर्णय नाही

News Desk