सांगली | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना होती. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत.
उद्धव ठाकरे यांची सोमवारी (२४ डिसेंबर) पंढरपूर येथे महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यासाठी शिवसैनिकांनी एसटी महामंडळाची एक बस भाड्याने घेतली होती. परंतु सभेहून परतत असताना पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर बसने अचानक पेट घेतला. गारगोटी आगाराची बस क्रमांक एमएच१४बीटी – ०७२८ ही पंढरपूरहून गारगोटीला जात होती. या बसमध्ये ४२ शिवसैनिक असून कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.