मुंबई | चांगले काम करणारे सगळे भाजपचे असतात असा विश्वास शिवसेनेला आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरितांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास अभिनेता सोनू सूद यांनी मदत केल्यामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
दरम्यान, सोनू सूदवरून राऊत यांनी शिवसेनेच्या सामनाच्या रोखठोकमध्ये सोनू सूद याला महात्मा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणाले होते. यावर प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, ‘सोनू सूद भाजपचे आहेत असे जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असे असले तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगले काम केले. त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे फडणवी यांना आज (८ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, आमचे सरकार राज्यात जलयुक्त शिवारचे काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पानी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळे त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिले,’ असे ते म्हटले. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणे पूर्णपणे चुकीचे आहे,’ अशी टीका त्यांनी राऊतांवर केली.
रोखठोकमध्ये नेमके काय म्हणाले
“महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,”
तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये बाहेरील लोकांना घ्यायला तयार नसताना सोनू सूद या सर्वांना नक्की कुठे पाठवत होता? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झालीच कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते सर्व मिळत होते. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता मोदींच्या ‘मन की बात’मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस जातील. एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणूनच सोनू सूद लॉकडाऊनचा मालामाल हिरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरुन निघाला.
संबंधित बातम्या
राऊत साहेबांना सोनू सूद सारखी प्रसिद्धी मिळवायची असेल तर एक उपाय !
सोनू सूदने ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली