HW News Marathi
Covid-19

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायलचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२९ जून) येथे केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरविणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जातात. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे, जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत.

ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्विता दर हा ९० टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अन्य रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्लाझ्मा डोनेशनबाबत प्रयत्न करावेत असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएम केअर फंडातील निधी मजूरांच्या रेल्वे तिकिटासाठी वापरण्यात येणार

News Desk

“कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालो”

News Desk

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियमांचे उल्लंघन, उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

News Desk