HW News Marathi
महाराष्ट्र

कास पठाराच्या पर्यावरणपूरक सुविधांतून पर्यटनाला चालना मिळणार

मुंबई | सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील (Kaas plateau) पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या चार ई-बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच, घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल मंत्री लोढा यांनी सांगितले.

मंत्रालयातून मंत्री लोढा यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेल्या कास पठाराच्या पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिकरित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे, त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चित वाव देण्यात येईल.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावील प्रदूषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच्या सुविधा मिळाव्या तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई – बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षापासून अतिरिक्त ई-बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सह्याद्री पर्वतरांगेत सातारा शहरापासून २५ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा कास पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात विविधरंगी फुलांचा बहर सुमारे १० चौरस कि.मी. क्षेत्रावर पाहायला मिळतो. या पठारावर सुमारे ८५० वनस्पतींचे विविध प्रकार आणि फुलपाखरे आढळतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत मान्सूनच्या प्रगतीनुसार पठार दर १५ – २० दिवसांनी रंग बदलत असते. अनेक स्थानिक व लुप्त होत चाललेल्या वनस्पती देखील इथे आढळतात. वनस्पतीशास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ठेवा उपयोगी ठरेल. मागील काही वर्षांपासून हे कास पठार पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कास पठाराला हंगामात दररोज  ३ हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात.

युनोस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भांडार असल्यामुळे येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटन विभाग पर्यावरणपूरक पर्यटन संकल्पनेंतर्गत या हंगामाकरिता चार ई-बसेस सुरु करत आहे. या बसेस कासने गावापासून कास पाठरापर्यंत अर्ध्या कि.मी.पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणास आळा बसण्यास मदत होईल.

पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर सौंदर्याने बहरलेला असतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयना जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जलक्रीडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसित करण्यात येईल आणि त्यातून या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य देण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध आरोप सिद्ध होत नाही –  सर्वोच्च न्यायालय

News Desk