मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “आधी आताचे पाहूया. नंतरचे नंतर बघू”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या चर्चांवर फारसे भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यापूर्वी छगन भुजबळ यांच्याबद्दल एक विधान केले होते. “आम्ही अगदी पारखून मोजक्याच जणांना आमच्या पक्षात घेत आहोत. उदाहरण द्यायचे झाले तर आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतले. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. मात्र, छगन भुजबळ यांना घेणार नाही”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. “आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना केवळ त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे मंत्रिमंडळात स्थान दिले आहे”, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.